Tarun Bharat

प्रशिक्षक रमेश पोवार यांची अकादमीत बदली

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ऋषीकेश कानिटकर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआयने) भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक आणि माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांची बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे माजी फलंदाज ऋषीकेश कानिटकर यांची नियुक्ती केली आहे.

आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बीसीसीआयने काही तातडीचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नव्या प्रमुख प्रशिक्षकाचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. ऋषीकेश कानिटकर हे यापूर्वी भारताच्या पुरुषांच्या अ आणि 19 वर्षाखालील वयोगटाच्या संघांसाठी नियुक्त केलेल्या प्रशिक्षक वर्गामध्ये होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील आगामी मालिका भारतात होणार असून या मालिकेसाठी ऋषीकेश कानिटकर यांच्याकडे फलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बेंगळूरच्या राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासमवेत आता रमेश पोवार क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करतील. रमेश पोवार यांची 2021 च्या मे महिन्यात दुसऱयांदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. मात्र त्यानंतर चालू वर्षीच्या प्रारंभी न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठ आली नाही. या महिन्यांच्या प्रारंभी बीसीसीआयने नव्या क्रिकेट सल्लागार समितीची नियुक्ती केली असल्याने आता लवकरच प्रमुख प्रशिक्षकपदाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका भारतात खेळवली जाणार आहे. उभय संघातील पहिला सामना 9 डिसेंबरला नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर याच स्टेडियममध्ये दुसरा सामना 11 डिसेंबरला खेळवला जाईल. या मालिकेतील उर्वरित तीन सामने 14, 17, 20 डिसेंबरला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय महिला संघ- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटीया, जेमिमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुकासिंग ठाकुर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वैद्य, एस. मेघना, रिचा घोष आणि हरलीन देओल.

Related Stories

रास दांडिया मध्येही थिरकली तरुणाई

mithun mane

बहरातील लाबुशानेचे चौथे शतक

Patil_p

राष्ट्रीय कनिष्ठ निवड सदस्यांसाठी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा अर्ज

Patil_p

हैदराबादचा ‘सनराईज’, गुंतागुंत वाढली!

Patil_p

राही सरनोबत तिसऱ्यांदा राष्ट्रीय विजेती

Patil_p

नीरज चोप्राने रचला नवा इतिहास!

Patil_p