दुसऱया दिवशी आंदोलन कायम, बंदरातील आस्थापनांना लाखोंचा फटका
प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव बंदरातून होणारी कोळसा व बॉक्साईटची वाहतुक वास्को शहराऐवजी नवीन महामार्गाकडे वळवावी, प्रदुषण रोखावे अशा मागण्यांसाठी मुरगावच्या युवकांनी रोखलेली मुरगाव बंदरातील मालवाहतुक काल दुसऱया दिवशीही बंदच राहिली. या आंदोलनामुळे जहाज कंपन्या तसेच मालवाहतुकदारांचे लाखोंचे नुकसान होऊ लागलेले आहे. मालवाहू अवजड वाहनांबरोबरच शेकडो ट्रक चालक व वाहकही बंदरात अडकून पडलेले आहेत.
गुरूवारी सकाळी मुरगावातील व विशेषता हेडलॅण्ड सडा भागातील युवकांनी मुरगाव बंदरातील गेट क्रमांक नऊवर ठाण मांडून बंदरातून बाहेर पडण्याचा रस्ता रोखून धरला होता. कोळसा व बॉक्साईटची वाहतुक हेडलॅण्ड सडामार्गे नवीन महामार्गावरून करण्यात यावी अशी मागणी करीत या युवकांनी आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत वास्को व मुरगावचे आमदार बंदराच्या गेट क्रमांक नऊवर येऊन आम्हाला मालवाहतुक वास्को शहरातून करणार नाही असे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही बंदरातून मालवाहतुक होऊ देणार नाही असा घेतलेला पवित्रा आंदोलक युवकांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत मुरगाव बंदरातून कोळसा व बॉक्साईटचा एकही ट्रक बाहेर पडू शकलेला नाही. मुरगाव बंदरासाठी व वाहतुकदारांसाठी ही समस्या गंभीर असली तरी वास्कोचे आमदार दाजी साळकर तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गेले दोन दिवस आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आश्वासन देण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. आमदार साळकर यांनी गुरूवारी वास्को शहरातून मालवाहतुक करण्यास विरोध व्यक्त केला होता. आमदार संकल्प आमोणकर यांनी मात्र, गेले दोन दिवस या आंदोलनाच्या प्रश्नावर प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही.
बंदरात कष्टकऱयांचे हाल, आस्थापनांना बसणार लाखोंचा फटका
बंदराचा रस्ता आंदोलक युवकांनी रोखून धरल्याने मागच्या दोन दिवसांपासून मोठय़ा संख्येने मालवाहू ट्रक बंदरातच अडकून पडलेले आहेत. या अवजड वाहनांबरोबरच त्याचे चालक व वाहकही बंदरात अडकून पडलेले असून त्यांचे हाल होऊ लागलेले आहेत. गेटच्या बाहेर आंदोलन होईल व ट्रक आतमध्येच अडकून पडतील अशी आगाऊ माहिती मिळाली असती तर आम्ही वाहने घेऊन बंदरात आलोच नसतो. आता आमचे खाण्या पिण्याचेही हाल सुरू झालेले आहेत. आंघोळ पाणीही होत नाही. कुणी आमच्या समस्येकडे लक्षही दिलेले नाही. आम्ही पोटापाण्यासाठी आलो होतो. मात्र अडचणीत सापडलो आहोत. सरकारने या समस्येवर त्वरीत तोडगा काढावा व आमची मुरगाव बंदरातून सुटका करावी अशी विनंती बंदरात अडकलेल्या कष्टकरी लोकांनी केली आहे. दुसऱया दिवशीही गेट बाहेर पडण्याचा रस्ता बंद राहिल्याने जहाजांच्या एजन्ट कंपन्या तसेच माल वाहतुकदार व इतर संबंधीत आस्थापनांना लाखोंचा फटका बसू लागलेला आहे.