वृत्तसंस्था/ पॅरिस
अमेरिकेची 18 वर्षीय टेनिसपटू कोको गॉफने पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा पराभव करून महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. महिला दुहेरीतही तिने अंतिम फेरी गाठली असून तिला दुहेरी मुकुट साधण्याची संधी मिळाली आहे.
18 व्या मानांकित कोको गॉफने बिगरमानांकित मार्टिना ट्रेव्हिसनची स्वप्नवत घोडदौड उपांत्य फेरीत रोखताना 6-3, 6-1 असा 88 मिनिटांत विजय मिळविला. शनिवारी जेतेपदासाठी तिची लढत पोलंडच्या अग्रमानांकित इगा स्वायटेकशी होईल. स्वायटेकने पहिल्या उपांत्य सामन्यात रशियाच्या दारिया कॅसात्किनाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. गॉफ व टेव्हिसन दोघींनी पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. 2004 मध्ये रशियाच्या मारिया शरापोव्हाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळविला होता. तिने त्यावेळी या स्पर्धेचे जेतेपदही मिळविले होते. त्यानंतर 18 वर्षीय गॉफ ही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिलीच सर्वात युवा खेळाडू आहे. त्याआधी 2001 मध्ये किम क्लिस्टर्सने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळविला होता.
2019 मध्ये 15 वर्षीय गॉफने विम्बल्डन स्पर्धेत चौथी फेरी गाठत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यानंतर ग्रँडस्लॅममध्ये तिला मोठी मजल मारता आली नव्हती. त्याआधी 2018 मध्ये तिने कनिष्ठ मुलींच्या गटात या स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. येथील स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना तिला टॉप 16 मधील एकाही खेळाडूविरुद्ध खेळावे लागलेले नाही. पण आता तिला अग्रमानांकित खेळाडूविरुद्द अंतिम फेरीत खेळावे लागणार आहे. तिच्यासाठी हा आजवरचा सर्वात मोठा सामना असेल. या दोघींत आजवर दोनदा गाठ पडली असून दोन्ही वेळेस स्वायटेकने बाजी मारली होती. 2021 मध्ये इटलीतील क्ले कोर्ट स्पर्धेत पहिल्यांदा आणि यावर्षी मियामी ओपनमध्ये दुसऱयांदा त्यांची लढत झाली होती.
‘मला स्वतःलाच यावेळी थोडा धक्का बसला आहे. काय प्रतिक्रिया द्यावी, यासाठी शब्दच सुचत नाहीत,’ अशा भावना गॉफने अंतिम फेरी गाठल्यानंतर व्यक्त केल्या. ‘या सामन्यात उतरताना मी अजिबात नर्व्हस नव्हते. किंबहुना या आठवडाभरात मी कधीच नर्व्हस झाले नाही आणि हे माझ्यासाठी आश्चर्यच आहे. मी रोज सकाळी वॉकिंगला जाते, ज्यामुळे डोक्यातील सर्व विचार, गोंधळ बाजूला होऊन मन स्वच्छ होते,’ असेही तिने सांगितले. स्वायटेक ही अग्रमानांकित असून टॉप टेनमध्ये स्थान मिळविणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू आहे. तिने 2020 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. ग्रँडस्लॅम एकेरीत जेतेपद मिळविणारी ती पोलंडची पहिलीच टेनिसपटू आहे.
दुहेरीतही गॉफ अंतिम फेरीत
महिला दुहेरीत कोको गॉफ जेसिका पेगुलासमवेत खेळत असून त्यांना आठवे मानांकन मिळाले आहे. उपांत्य लढतीत या दोघींनी मॅडिसन कीज व टेलर टाऊनसेन्ड यांच्यावर 6-4, 7-6 (7-4) अशी मात करून अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे चारही खेळाडू अमेरिकेच्याच आहेत. 14 व्या मानांकित एलेना ओस्टापेन्को व ल्युडमिला किचेनॉक आणि कॅरोलिन गार्सिया व क्रिस्टिना म्लाडेनोविक यांच्यातील विजयी जोडीशी गॉफ-पेगुला यांची जेतेपदासाठी लढत होईल.
गार्सिया व म्लाडेनोविक यांनी 14 व्या मानांकित ओस्टापेन्को व किचेनॉक या या जोडीचे आव्हान 2-6, 6-4, 6-2 असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. पहिले दोन सेट झाल्यानंतर हा सामना काही काळ थांबवण्यात आला होता.