देशभर यंदा कडाक्याची थंडी असून, सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे. उत्तरेच्या अनेक भागांना थंडीच्या लाटेचा तडाखा बसला आहे. हिमालयातील अनेक भागात बर्फवृष्टी होत असून, सरासरीपेक्षा उणे तापमान नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे थंडीच्या लाटेत राजस्थानही गारठला असून, हंगामात उणे 4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे. आता पुढील काही दिवसच थंडीचा हंगाम राहणार असून, तोपर्यंत थंडी अनुभव नागरिक घेणार आहेत.
देशाने यंदा पावसाचा दणका अनुभवला. ढगफुटी, महापूर यासारख्या आपत्तींना अनेक राज्यांना व शहरांना सामोरे जावे लागले. आता पावसाळय़ाबरोबरच यंदाचा थंडीचा हंगामही देशासाठी, येथील नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. हुडहुडी भरविणारी थंडी, किमान तापमानातील लक्षणीय घसरण, बर्फवृष्टी, धुके याला नागरिकांना तोंड द्यावे लागत असून, जनजीवनही काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे पहायला मिळते. त्यामुळे एरवी काव्यात्मक वाटणारी गुलाबी थंडी आता कसोटीची ठरताना दिसते.
यंदाच्या हंगामात थंडी सर्वसाधारण राहण्याचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटपासूनच थंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबर व डिसेंबरच्या कालावधीत उत्तर तसेच वायव्येच्या भागातील कोअर झोनमधील राज्यांना थंडीच्या लाटेचा तडाखा बसला. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या भागात बर्फवृष्टी कायम असून, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानच्या भागात तीव्र थंडीची लाट जानेवारी सुरुवातीलाच नोंदविण्यात आली. यामुळे मध्य भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा तसेच कर्नाटकपर्यंत या लाटेचा प्रभाव जाणवला. ही लाट काही काळ कायम राहिली. त्यानंतर हिमालयात धडकलेल्या पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. बुधवारपपर्यंत ही लाट कायम राहिली. त्यानंतर मात्र थंडीत घट होण्याचा अंदाज आहे.


महाराष्ट्र गारठला
महाराष्ट्राच्या दृष्टीने यंदा थंडीत चढउतार राहिले. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट राहिली. त्यातही मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका राहिला. विदर्भ, मराठवाडय़ाच्या अनेक भागांत एक आकडी किमान तापमान राहिले. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रही गारठला. उत्तरेकडून येणारे थंड वारे व कोरडय़ा हवामानामुळे किमान तापमान मोठय़ा प्रमाणात घटले. कोकण-गोव्यात आतापर्यंत तुलनात्मकदृष्टय़ा म्हणावा तसा थंडीचा कडाका जाणवला नाही. 10 अंश सेल्सिअसच्या वरच या भागात किमान तापमान राहिले. दुसरीकडे जळगाव, पुणे, नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड तसेच जळगावमध्ये किमान तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. राज्याच्या अनेक भागात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान नोंदविण्यात आले आहे.
राजस्थानला लाटेचा फटका
राजस्थानला यंदा थंडीच्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. जानेवारीत आलेल्या थंडीच्या लाटेमुळे या भागात किमान तापमान उणे 4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. याशिवाय मैदानी भागात सर्वात कमी तापमान पश्चिम राजस्थानातील चुरू येथे 2.5 अंश सेल्सिअस इतके गेल्या आठवडय़ाभरात नोंदविण्यात आले आहे.
राजधानी गारठली
थंडीच्या प्रकोपातून राजधानी दिल्ली ही सुटली नसून, 2021 नंतर येथे सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले आहे. जानेवारीत पसरलेल्या तीव्र थंडीच्या लाटेत दिल्लीत सफदरगंज येथे 1.4, तर लोधी रोड येथे 1.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. यामुळे या भागातील शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. 18 जानेवारीपर्यंत दिल्लीत आठ दिवस तीव्र थंडीचे नोंदविण्यात आले आहेत.


धुक्याचे साम्राज्य
उत्तरेत पसरलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. याच्या प्रभावामुळे गेल्या काही दिवसात जनजीवत विस्कळीत झाले असून, विमानांचे उड्डाण, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक विमाने व रेल्वे उशिरा धावत आहेत, तर काही रद्दही कराव्या लागत आहेत.
दिल्लीच्या वायूप्रदुषणात कमालीची वाढ
दरम्यान, थंडीच्या दिवसात हवेची घनता जास्त असल्याने तसेच हवेची हालचाल मंदावल्याने धुलीकण वातावरणात साठून राहतात. त्यामुळे या काळात वायू प्रदूषण जास्त राहते. दिल्लीसह अनेक शहरांना मागच्या काही वर्षांपासून या वायू प्रदुषणाला मोठय़ा प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. यंदाही दिल्लीसारख्या शहराला याची धग जाणवली. दिल्लीतील प्रदुषणाची पातळी कमालीची वाढल्याने प्राथमिक शाळाही बंद ठेवाव्या लागल्या. तरग्न दिल्ली सरकारकडून 50 टक्के कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला गेला. नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे नेमेचि होते प्रदूषण, अशी आज दिल्लीची अवस्था बनली आहे.
मुंबईची हवाही अतिखराब
तसे मुंबईचे हवामान हे उष्ण वा दमट. त्यामुळे मुंबई फारशी थंडी पडत नाही. त्यामुळे ती जाणवण्याचा फारसा प्रश्न पडत नाही. या वर्षी मात्र मुंबईच्या काही भागांत मोठय़ा प्रमाणात थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. याशिवाय मुंबईतील हवेची गुणवत्ता ही अतिखराब झाल्याचे दिसून आले आहे. थंडीच्या जोडीला वाहनांची वाढती संख्या, त्यातून होणारे प्रदूषण, बांधकामे या गोष्टी याला कारणीभूत असल्याचे दिसून येते. दिल्ली, मुंबईपाठापोठ देशातील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती पहायला मिळत आहे. कडाक्याची थंडी आणि वाढते प्रदूषण ही या शहरांमधील समस्या भविष्यात अधिक उग्र होण्याचा जणू इशाराच यातून मिळाला आहे. कोविडमुळे मागच्या दोन वर्षांत अनेक निर्बंध कमी होते. हे सर्व निर्बंध उठल्यानंतर यंदाचा थंडीचा हंगाम अधिक प्रदुषित व आव्हानात्मक बनला आहे.
वातावरणात मोठे चढ-उतार
सध्या जगातील सर्वच देशांना ग्लोबल वॉर्मिंग वा वातावरण बदलाच्या समस्येशी सामना करावा लागत आहे. या वर्षीच्या थंडीचा विचार केला, तर त्यात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार दिसतात. कधी किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास असणे, तर कधी आठ अंश सेल्सिअस वा त्यापेक्षा खाली जाणे, हा अनुभव अनेक शहरांना व तेथील नागरिकांना आला आहे.


आजारपणात वाढ
महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोविडचे कोणतेही नवीन रुग्ण आढळले नसले, तरी कडाक्याच्या थंडीत कोरडा खोकला, सर्दी, विषाणूजन्य ताप आणि उलटय़ा या प्रमुख तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून ही रुग्णसंख्या वाढत असून, यामध्ये लहान मुले आणि ज्ये÷ांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसत आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी राज्यात तसेच लगतच्या भागांत या आजाराचे रुग्ण आढळलेले नाहीत. मात्र, बदलत्या हवामानामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांची प्रकरणे समोर येत आहेत. सध्या अनेक शहरांतील किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, बहुतेक मुले, ज्ये÷ नागरिक आणि गरोदर महिलांना या वारंवार होणाऱया हवामान बदलांचा त्रास होताना दिसून येत आहे.


आरोग्याची काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
हे पाहता थंडीमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत. संतुलित आहाराचे सेवन आणि भरपूर पाणी प्यावे. 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप सतत येत असेल, खोकला असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही आजाराचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. ऋतू बदलत असताना असे संक्रमण सामान्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


यंदाचे वर्ष थंड ठरणार का?
पावसाच्या अधिक वा कमी दिवसांचा थंडीच्या कडाक्याशी संबंध नसतो. यंदा सहा टक्के अधिकचा पाऊस झाला. मान्सूनोत्तर पाऊसही अधिक प्रमाणात झाला. म्हणूनही थंडीच अधिक पडली, असे म्हणता येत नाही. तर ला निनामुळेही थंडीच्या दिवसांची संख्या वाढू शकते, असे हवामान विभाग म्हणतो. 2019 हे शतकातील दुसरे सर्वांत थंड वर्ष ठरले होते. असे असले, तरी त्या वर्षी ला निनाची परिस्थिती नव्हती. या पार्श्वभूमीवर यंदाचे वर्ष असेच थंड म्हणून नोंदविले जाणार का, याबाबत औत्सुक्य असेल.
भारतासारख्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतू मानले जातात. तीव्रता वाढली, की या तिन्ही ऋतूंमध्ये काही भागांतील नागरिकांची कसोटी लागते. विशेषतः उत्तर भारतातील नागरिकांना हिवाळय़ातील गोठवणाऱया थंडीचा मोठय़ा प्रमाणात सामना करावा लागतो. यंदाही हेच चित्र दिसून येत असून, उत्तरेतील थंड वाऱयांचा परिणाम अन्य राज्यांमध्ये व तेथील शहरांमध्येही पहायला मिळत आहे. पुढच्या टप्प्यातही थंडीमध्ये चढ-उतार राहण्याचा अंदाज आहे. किंबहुना, आगामी काळात ढगफुटी, महापूर, उष्णतेच्या लाटांबरोबरच थंडीच्या लाटांशी लढण्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा. त्यासाठी पर्यावरण संरक्षण, वाहनांची संख्या मर्यादित ठेवत पर्यावरणपूरक वाहनांचा अवलंब करणे, प्रदुषणाची पातळी कमी करणे यांसह विविध बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. एरवी थंडी हा आरोग्यदायी ऋतू मानला जात असला, तरी दिवसेंदिवस हा ऋतूही ‘आजारी’ होत असल्याचे दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी शास्त्रज्ञ, तज्ञ, अभ्यासकांच्या माध्यमातून थंड डोक्याने जाणीवपूर्वक पावले उचलावी लागतील.
संकलन ः पुणे, प्रतिनिधी