श्रीनगरमध्ये पारा उणे 5 पर्यंत घसरला ः दिल्लीत धुक्याची चादर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीसह देशाच्या उत्तरेकडील भागात सलग चौथ्या दिवशी सकाळी दाट धुके राहिले. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा ते बिहार अशी 11 राज्ये सध्या थंडीच्या लाटेचा सामना करत आहेत. श्रीनगरमध्ये पारा -5 वर पोहोचला आहे. त्याचवेळी दिल्लीत धुक्मयामुळे दृश्यमानता खूपच कमी झाल्याचे रविवारी सकाळी दिसून आले.
बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे काही मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. भागलपूरमध्ये तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. थंडीची लाट पाहता बिहारमधील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, हरियाणामध्येही तापमान 5.8 अंशांवर पोहोचले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडण्याची शक्मयता आहे. या राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत थंडी आणखी वाढू शकते. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये काही ठिकाणी दाट धुके आणि दवबिंदू तीव्र होण्याची शक्मयता आहे. दिल्लीत 26 डिसेंबरला पारा 4 अंशांपर्यंत घसरू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ आणि तेलंगणाच्या काही भागांमध्येही थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
देशाच्या वायव्य मैदानी भागात किमान तापमान पाच ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पंजाब आणि हरियाणाच्या बहुतांश दिवसाच्यावेळीही थंडी पडत असल्याने लोक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. श्रीनगरमध्ये पारा -5.4 पोहोचला असतानाच पहलगाममध्ये -6.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, किनारी आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत येत्या एक-दोन दिवसात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.