नव्याने एमएससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग हे जिल्हाधिकारी; तर सीईओ म्हणून किर्ती पुजारी रुजू होणार
रत्नागिरी प्रतिनिधी
शासनस्तरावरून सनदी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची नांदेड जिल्ह्यातील वाघाला महानगरपालिका येथे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे येथील एमएससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग हे रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचीही बदली झाली आहे. त्यांच्या जागी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती पुजारी यांची नेमणूक झाली आहे.
राज्य सरकारने राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी गुरूवारी रात्री उशिरा जाहीर केली. त्यामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व सीईओ डॉ. जाखड यांचा समावेश आहे. डॉ. बी. एन. पाटील यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हातात घेऊन अवघे सव्वा वर्ष उलटले होते. इतक्या कालावधीत त्यांची शासनस्तरावरून बदली झाली आहे.
तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनीही आपल्या प्रशासकीय कामकाजाची छाप येथील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील जनमानसांवर पाडली. जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील संबंध मागील काही महिन्यांपूर्वी बिघडले होते. पण डॉ.जाखड यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याची मोलाची भूमिका घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार उत्तमरित्या पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत झाली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजनकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोगाची कार्यवाही झाली. कोरोना काळातही जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यात डॉ.जाखड यांचे मोलाचे योगदान होते.