रत्नागिरी प्रतिनिधी
माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण आता लवकरच वादग्रस्त साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार आहे. मुरुडमधील या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटी आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची आज संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप करत तो असून तो पाडला जावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
दरम्यान आजच्या बैठकीबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी संगीतलं की, केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, हे रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार ही कारवाई होणार असं जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी यावेळी सांगितलं.