इराण हा देश अनेक चित्रविचित्र गोष्टींनी भरलेला आहे. तेथे मिठाच्या टेकडय़ा असून त्यांना सॉल्ट डोम्स देखील म्हटले जाते. अशा टेकडय़ा इराणमधील दक्षिण, दक्षिण-पश्चिम आणि मध्य भागात दिसून येतात. विविध ऋतूंमध्ये या टेकडय़ांचा रंग वेगवेगळा दिसून येत असतो.
इराण अन् अझरबैजानमध्ये असणाऱया या पर्वतांचा मुख्य हिस्सा इराणमध्येच आहे. याचे सर्वाधिक प्रमाण जागरोस फोल्डेड झोन आणि पारसच्या आखातातील भागात आढळून येते. इराणच्या होर्मोजगान, करमन, सेमनान आणि घोम प्रांतात हे पर्वत अधिक प्रमाणात दिसून येतात.
इराणमधील सर्वात सुंदर मिठाचा पर्वत बुशहर काउंटीतील जशक सोल्ड डोम, घेसाम आयलंड येथील नमकदान, फार्स प्रांतातील केनर सियाह अन् जहानी, जंजानमधील अंगुरन आणि घोम प्रांतातील घोम काउंटीत आहे. या पर्वतांना कुणीही दूरवरून पाहूनच ओळखू शकतो. हे विविध रंगाचे, आकाराचे अन् वैविध्यपूर्ण असतात.
मिठाच्या टेकडय़ांची निर्मिती वेगवेगळय़ा कारणांनी झाली आहे. यात गुहा, झरे अन् मिठाचे ग्लेशियर देखील आहेत. अशाप्रकारचे दृश्य जगात अन्यत्र कुठेच दिसून येणार नाही. केवळ जागरोस पर्वतांमध्ये अशाप्रकारचे 130 सॉल्ट डोम्स दिसून येतात. नमकदान पर्वतीय भागात 6400 मीटर खोल गुहा आहेत. तेथे मिठाचे ग्लेशियर, मिठाचे झरे, कार्स्ट सिंकहोल दिसून येते.
घेसम सॉल्ट डोम जगातील सर्वात लांबीची मिठाची गुहा आहे. सर्वसाधारणपणे या गुहा मानवी वस्तीपासून दूर आहेत. परंतु पर्यटक येथे पोहोचत असतात. या ठिकाणाचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश आहे. मिठाचे पर्वत सर्वसाधारणपणे हॅलाइट, एनहाइड्राइट, जिप्सम आणि क्ले खनिजांनी तयार झालेले असतात. क्ले मिठासोबत येत असते आणि याचमुळे रंग गडद दिसून येत असतो. मिठाचे पर्वत सर्वसाधारणपणे मध्यपूर्वेत होर्मूझच्या किनाऱयावर आहेत. संयुक्त अरब अमिरात अन् ओमानमध्येही याचे दर्शन घडते.
हे रंगबिरंगी पर्वत लाखो-कोटय़वधी वर्षांपूर्वी तयार झाले आहेत. वैज्ञानिक याला सॉल्ट टेक्टोनिक असे संबोधितात. इराणमधील मिठांच्या पर्वतांना आता धोका निर्माण झाला आहे. या पर्वतांच्या भूगर्भात कच्च्या तेलाचा साठा आहे. हे कच्चे तेल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात या सुंदर पर्वतांचे अस्तित्व संपण्याची भीती आहे.