ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांना प्राचार्य त्रास देत असल्याचा आरोप करत बांगर यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप बांगर यांची यासंदर्भात प्रतिक्रिया समजू शकली नाही.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांचा कान पकडून बांगर यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना मारहाण केली. प्राचार्यांच्या मानसिक छळामुळे काही महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. त्यावरुन बांगरांनी महाविद्यालयात जाऊन उपाध्याय यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे समजते.या संपूर्ण प्रकारामुळे बांगर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सतत कायदा हातात घेत हातघाईवर येणाऱ्या बांगरांवर कारवाईची मागणी होत आहे.
अधिक वाचा : आत्महत्या नव्हे हत्या! चुलत भावानेच संपवले कुटुंबातील 7 जण
दरम्यान, यापूर्वीही बांगर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बांगर यांनी यापूर्वीही पोलीस कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली होती.