मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण : बाजारात सुक्यामेव्याची आवक वाढली
बेळगाव : मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. शुक्रवारी पहाटे 5.10 ते सायं. 6.47 पर्यंत पहिला रोजा झाला. रमजानमुळे मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे निर्बंध आले होते. मात्र यंदा रमजान उत्साहात होणार आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. रमजान या महिन्यात उपवास आणि नियमितपणे नमाज पठण केले जाते. त्यामुळे बाजारात सुक्यामेव्याची आवक वाढली आहे. खारीक, खजूर आणि इतर पदार्थांची मागणी वाढली आहे. याचबरोबर कलिंगड, खरबूज व पपई आदी फळांना पसंती दिली जात आहे. रमजानसाठी गुरुवारी रात्री 8 पासून तराबिह नमाजाला सुरुवात झाली. ही नमाज दररोज रात्री महिनाभर अदा केली जाणार आहे. शहरात 100 हून अधिक लहानमोठ्या मशिदी आहेत. यामध्ये रमजान महिन्यातील नमाज पठणाचे नियोजन केले जात आहे.