प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बेंगळूर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती केएफडीसीचे सदस्य सुरेश देसाई यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
कर्नाटक फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धन, जंगलांचे संरक्षण तसेच निसर्ग वाचविण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे. दि. 15 जून ते 25 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.
या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन बेंगळूर येथे कंठिरव्वा स्टेडियममध्ये 15 जून रोजी करण्यात आले. यावेळी केएफडीसीच्या अध्यक्षा तारा अनुराधा, म्हैसूरचे राजे यदुवीर वडेयर, पीसीसी प्रमुख आर. के. सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
25 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे केएफडीसीचे सदस्य सुरेश देसाई यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात सायकलफेरीने करण्यात आली. राज्यातील वन कर्मचाऱयांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 500 वन कर्मचाऱयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये कबड्डी, धावणे, व्हॉलीबॉल, कॅरम, बॅडमिंटन यासह विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दि. 21 रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 25 जून रोजी सुवर्णमहोत्सवी मुख्य कार्यक्रम करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विधान भवनातील सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमास राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, वनमंत्री उमेश कत्ती, आमदार रिझवान हर्षद, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यासह अन्य मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत.