महागाईपासून काहीअंशी दिलासा ः दिल्लीत किंमत 2219 रुपये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
19 किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 135 रुपयांनी कमी झाली आहे. परंतु 14.2 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कुठलीच कपात झालेली नाही. कमर्शियल सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
1 जून रोजी झालेल्या बदलानंतर दिल्लीत 19 किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरचे दर कमी होत 2,219 रुपये झाला आहे. यापूर्वी हा सिलिंडर 2,354 रुपयांमध्ये मिळत होता. अशाचप्रकारे कमर्शियल सिलिंडरचा दर कोलकात्यात 2,454 रुपयांच्या जागी 2,322 रुपये झाला आहे. मुंबईत आता याची किंमत 2,306 रुपयांच्या जागी कमी होत 2,171 रुपयांवर आली आहे.
यापूर्वी 19 मे रोजी घरगुती वापराच्या आणि कमर्शियल सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. एकाच महिन्यात सिलिंडरच्या किमतीत दुसऱयांदा वाढ करण्यात आली होती. तर 1 मे रोजी 19 किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 102 रुपयांनी वाढली होती.