घरगुती सिलिंडरचे दर मात्र स्थिर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 30 रुपयांनी कपात केली आहे. इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल कंपन्यांकडून संयुक्तपणे हा निर्णय घेण्यात आला. या कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी केली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. कमर्शियल सिलिंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इंडियन ऑईलकडून मिळालेल्या माहितीनुसार आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलोच्या कमर्शियल किंवा व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,646 रुपये झाली आहे. तसेच या सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,756 रुपये, मुंबईमध्ये 1,598 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,809.50 रुपये झाली आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच 1 जून 2024 रोजीही सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 69.50 रुपयांनी कमी झाली होती. त्यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यातही किमती कमी झाल्या होत्या.