घरगुती गॅसदरात कोणताही बदल नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडर वापरणाऱयांना दिलासा दिला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सोमवारपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडर दर 1,936.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2,141 रुपयांवर आला आहे. या दरकपातीचा फायदा रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना होणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याने गृहिणींना अजूनही दरकपातीची प्रतीक्षा आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 2,012.50 रुपयांवरून 1,976.50 रुपयांवर आली आहे. तसेच कोलकाता येथे पूर्वी 2,132.00 रुपयांना उपलब्ध असलेला गॅस सिलिंडर 1 ऑगस्टपासून तो 2,095.50 रुपयांना उपलब्ध होत आहे. चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2,141 रुपये प्रतिसिलिंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2,177.50 रुपये प्रतिसिलिंडर होती.
घरगुती सिलिंडर किंमत स्थिर
विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी कोणताही बदल झालेला नाही. सध्या 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 6 जुलैच्या सुधारित दराने उपलब्ध आहेत. मागील महिन्यातील किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.