आपत्ती निवारणाची अधिकाऱयांकडून घेतली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ाचे दिवस जवळ येत असून महापुरासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती निवारण विभाग सज्ज आहे. आपत्ती निवारण विभागाची माहिती घेण्यासाठी मंगळवारी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी गोवावेस येथील अग्निशमन विभागाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपत्ती निवारणासाठी लागणाऱया साहित्याची माहिती जाणून घेतली.
मागील तीन ते चार वर्षांत जिल्हय़ात महापुराने थैमान घातले. महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती निवारण विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. यावषी देखील पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आपत्ती निवारण विभाग आतापासूनच कामाला लागला आहे. अग्निशमन जवानांसोबत एसडीआरएफ व होमगार्डस्ना प्रशिक्षण दिले जात आहे.
मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्तांनी अग्निशमन विभागाला प्रथमच भेट देऊन दिले जाणारे प्रशिक्षण व साहित्याची माहिती घेतली. जिल्हा अग्निशमन अधिकारी शशिकांत निलगार यांनी पोलीस आयुक्तांचे स्वागत केले. ठाणाधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपत्ती निवारण विभागाची माहिती पोलीस आयुक्तांना दिली. यावेळी साहाय्यक अग्निशमन अधिकारी, जवान तसेच होमगार्ड उपस्थित होते.