निजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांची ग्वाही
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितच सोडवू त्यासाठी आम्हाला सत्तेत यावे लागणार आहे. आम्ही आश्वासन देणारे नाही तर करून दाखविणारे आहोत. तेव्हा वायव्य शिक्षक मतदारसंघातून निजदच्यावतीने निवडणूक लढवत असलेल्या चंद्रशेखर लोणी यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि निजदचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे.
गांधीभवन येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये त्यांनी शिक्षकांना आवाहन केले. दीपप्रज्वलन करून या प्रचारसभेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सच्चिदानंद खोत, शंकर माडलगी, प्रमोद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कुमारस्वामी यांनी, शिक्षकांना विविध समस्या भेडसावत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या समस्या सोडविण्याची ते मागणी करत आहेत. पेन्शन याचबरोबर ज्या शाळांना अनुदान नाही त्या शाळांना अनुदान उपलब्ध केले पाहिजे. मात्र त्याकडे इतर पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. आम्ही सत्तेत येताच शिक्षकांच्या समस्या निश्चितच सोडवू, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे.
20 वर्षांपासून शिक्षकांना समस्या
गेल्या 20 वर्षांपासून शिक्षकांना समस्या आहेत. ज्या शाळांना अनुदान नाही त्या शाळांना अनुदान देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यासाठी विधानसभेत मागणीदेखील केली आहे. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आम्ही सत्तेत असताना संपूर्ण राज्यामध्ये 1 लाख शिक्षकांना नोकरीत सामावून घेतले. मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या पक्षांनी शिक्षकांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे.
सध्या सरकारची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात शिक्षकांचे कधीच भले होणार नाही. केवळ घोषणा करणारे हे सरकार आहे. अनेक आश्वासने देत आहेत. मात्र ती आश्वासने पूर्ण करण्यास तयार नाहीत. तेव्हा तुम्हीच आता निर्णय घ्या आणि आमच्या पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर लोणी यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उमेदवार चंद्रशेखर लोणी यांनीही आपले विचार व्यक्त करून शिक्षकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.