वृत्तसंस्था /नव दिल्ली
बर्मिंगहममध्ये होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 18 सदस्यीय महिला हॉकी संघाची घोषणा केली असून पूर्ण तंदुरुस्त नसल्याने राणी रामपालला या संघातही स्थान देण्यात आलेले नाही. या संघाचे नेतृत्वही सविता पुनियाकडे सोपविण्यात आले आहे.
पुढील महिन्यात होणाऱया महिला विश्वचषक हॉकीसाठी निवडण्यात आलेल्या संघातील खेळाडूंनाच राष्ट्रकुलसाठीही निवडण्यात आले आहे. त्यात फक्त तीन बदल करण्यात आले आहेत. दीप ग्रेस एक्का या संघाची उपकर्णधार असेल. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे तर विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स व स्पेनमध्ये 1 ते 17 जुलै या कालावधीत होणार आहे. राष्ट्रकुल संघात बिछू देवीच्या जागी रजनी एतिमरपूची निवड करण्यात आली. विश्वचषकात संगीता कुमारी राखीव खेळाडू आहे. पण राष्ट्रकुलसाठी तिला मुख्य संघात स्थान दिले आहे. सोनिकाला मात्र संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ अ गटात असून याच गटात इंग्लंड, कॅनडा, वेल्स, घाना यांचाही समावेश आहे. भारतीय महिलांची सलामीची लढत 29 जुलै रोजी घानाविरुद्ध होईल. 2014 मध्ये झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुलमध्ये भारताला चौथे स्थान मिळाले होते. कांस्यपदकाच्या लढतीत त्यांना इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती. प्रो लीग हॉकीमध्ये भारतीय महिलांनी पहिल्यांदाच भाग घेत अर्जेन्टिना व नेदरलँड्स यांच्यानंतर तिसरे स्थान मिळविले असल्याने यावेळच्या राष्ट्रकुलमध्ये त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.
राष्ट्रकुलसाठी महिला हॉकी संघ ः गोलकीपर-सविता (कर्णधार) व रजनी एतिमरपू, बचावफळी-दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता. मध्यफळी-निशा, सुशीला चानू पुखराम्बम, मोनिका, नेहा, ज्योती, नवज्योत कौर, सलिमा टेटे. आघाडीफळी-वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगीता कुमारी.