पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना : योग्यप्रकारे सर्व्हे करण्याचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान तसेच घरांची पडझड झाली आहे. त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई देताना योग्य सर्व्हे करून संबंधित व्यक्तीला ती नुकसानभरपाई द्यावी, अशी सूचना करून पुरासंदर्भातील इतर समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी अधिकाऱयांना विविध सूचना केल्या आहेत.
जिल्हय़ात पाऊस जरी झाला असला तरी अद्याप कोणतेही जलाशय पूर्ण भरले नाही. त्यामुळे जलाशयामधून पाण्याचा विसर्ग करू नये. पुरासंदर्भात नुकसान झालेला संपूर्ण अहवाल तयार करून सरकारकडे पाठवून द्यावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. कल्लोळ बॅरेज येथे पाऊस मोजमापणी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवून द्यावा. तातडीने तो प्रस्ताव मंजूर करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बळ्ळारी नाल्याचा अहवाल द्या
बळ्ळारी नाल्यामुळे मोठे नुकसान होत आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे बळ्ळारी नाल्यासंदर्भातील संपूर्ण अहवाल तयार करून तो तातडीने पाठवावा. जेणे करून या नाल्याची खोदाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी उद्योग खात्री योजनेंतर्गत या नाल्याची खोदाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अथणी येथे जवळपास 4 हजार पुनर्वस्तीसाठी घरे बांधण्यात आली आहेत. नेहमी पूर येणाऱया भागातील कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी या घरांची बांधणी करण्यात आली आहे. आता या घरांमध्ये पूरग्रस्त परिसरातील कुटुंबे येऊन राहत आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. जिल्हा प्रशासनाने योग्य प्रकारे पूर परिस्थिती तसेच इतर समस्या हाताळल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे कौतुक केले आहे.
पिकांना सध्या पावसाची चांगली साथ
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जुलैमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावषी 41 टक्के अधिक पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्येही आतापर्यंत 22 टक्के अधिक पाऊस झाला असून पिकांना सध्या पावसाने चांगली साथ दिल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजापूर जलाशयातून अद्याप पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे भीतीचे कारण नाही. सध्या या जलाशयात केवळ 23 क्युसेक पाणी दररोज साठा होत आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकला कोणताही धोका नसल्याचे सांगितले.
जिल्हय़ामध्ये एकूण 97.14 टक्के पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी अधिकारी शिवनगौडा पाटील यांनी सांगितले. प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये नुकसानीबाबतची छायाचित्रे प्रसिद्ध करावीत. घर कोसळले असेल तर त्याचे छायाचित्र त्या ठिकाणी लावावे. कोणाचीही तक्रार असल्यास त्या ठिकाणी मांडाव्यात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, संतोष कामगौडा, शशिधर बगली, नगरविकास खात्याचे अधिकारी ईश्वर उळागड्डी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.