Tarun Bharat

पूरग्रस्तांना 24 तासात नुकसानभरपाई द्या!

Advertisements

पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : जिल्हय़ात 255 कोटी रुपयांचे नुकसान

प्रतिनिधी /बेळगाव

मुसळधार पावसामुळे जिल्हय़ातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान तर घरांची पडझडही झाली आहे. अनेकांची घरे कोसळल्यामुळे ते बेघर झाले आहेत. तेव्हा तातडीने सर्व्हे करून संबंधित कुटुंबांना 24 तासांच्या आत नुकसानभरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बेळगावच्या तहसीलदारांना नुकसानीबाबतची माहिती देता आली नाही. त्यामुळे त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे तातडीने झाला पाहिजे. कोणत्याही कुटुंबाला त्रास होता कामा नये. 2019 नंतर अनेक कुटुंबांनी धोकादायक घरे सोडली आहेत. त्यांनाही योग्य नुकसानभरपाई द्यावी. पिकांचा सर्व्हे करून तातडीने शेतकऱयांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत पाऊल उचलावे, असे सांगितले. जिल्हय़ामध्ये एकूण 255 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.

‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करा

देशाविषयी प्रत्येकालाच प्रेम असते. ते प्रेम आता प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून व्यक्त करावे, असे आवाहन पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले आहे. जिल्हय़ामध्ये 10 लाख घरे आहेत. त्या प्रत्येक घरावर स्वेच्छेने ध्वज फडकवावा, असे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत 75 टक्के कुटुंबांना ध्वजांचे वितरण करण्यात आले आहे. 7 लाख 50 हजार ध्वज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशन योजनेचा वेग वाढवा

ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ती योजना अधिक तीव्रगतीने राबवा. जेणेकरून प्रत्येक घराला स्वच्छ पाणीपुरवठा होईल, असे त्यांनी सांगितले. ही योजना राबविताना पूर्वीच्या पाणी योजनाही तशाच सुरू ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

कोविडबाबत दक्षता घ्या

कोविडबाबत आताही संपूर्ण ती दक्षता घेण्यात आली आहे. कोविडबाबत लागणारी सर्व औषधे प्रत्येक जिल्हय़ामध्ये उपलब्ध केली आहेत. मार्च 2020 ते 8 ऑगस्ट 2022 पर्यंत 21 लाख 14 हजार 988 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 1 हजार 62 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामधील 99 हजार 647 जणांनी कोरोनावर मात केली तर 1005 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याही स्वॅब तपासणी सुरू आहे. सध्या जिल्हय़ामध्ये 410 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

उपचारासाठी यंत्रणा सज्ज

संभाव्य चौथ्या लाटेचा विचार करून सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. खासगीबरोबरच सरकारी हॉस्पिटलमध्ये राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. ऑक्सिजनही उपलब्ध करण्यात आला आहे. एकूण खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये 2 हजार 796 खाट राखीव ठेवले आहेत. एकूण 40 खासगी हॉस्पिटलमध्येही सोय करण्यात आली आहे. 191 व्हेंटीलेटर सज्ज ठेवले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बळ्ळारी नाल्यासंदर्भात 16 ऑगस्ट रोजी बैठक

बळ्ळारी नाल्यामुळे दरवषीच मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी अधिकाऱयांची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये संपूर्ण आढावा घेतला जाईल आणि निर्णय घेऊन नाल्याची सफाई व खोदाई केली जाईल, असे पालकमंत्री कारजोळ यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बळ्ळारी नाला येतो. त्याठिकाणी महानगरपालिकेने सर्व्हे करून काम केले पाहिजे. तर ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱया या नाल्याच्या खोदाईसाठी लघुपाटबंधारे खाते आणि जिल्हा पंचायत यांच्या माध्यमातून काम केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

हिंडलगा कारागृहातील कच्च्या कैद्याचा मृत्यू

Patil_p

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचे यश

Amit Kulkarni

दूधगंगा नदीत युवक बुडाला

Amit Kulkarni

पंचायतराज खात्याच्या अधिकाऱयांची बेळगावला भेट

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?

Patil_p

मैला काढण्यासाठी व्यक्तीचा वापर करणे गंभीर बाब

Amit Kulkarni
error: Content is protected !!