अशोक परब यांचे प्रतिपादन
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
स्पर्धकामध्ये सकारात्मक दृष्टीकोन व आशावाद असणे गरजेचे असून संयम व शिस्त तेवढीच महत्त्वाची आहे. स्पर्धा म्हणजे प्रभावी कामगिरीच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करणे होय, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब यांनी केले.
सडा वास्को येथील स्वरब्रह्म सांस्कृतिक संस्थेतर्फे शारदोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील बक्षीस वितरण सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेच्या 35 व्या वर्धापनदिनानिमित्त दिंडी सम्राट बाबू गडेकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला वास्को भाजपाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, संस्थेचे सल्लागार उमेश साळगावकर, परीक्षक दुर्गाकुमार नावती, लोककलाकार लाडू परवार, बाबू गडेकर व संस्थेचे अध्यक्ष राजाराम गडेकर हे उपस्थित होते. संजय सातार्डेकर म्हणाले, उत्तम कलाकार घडविणारी बाबू गडेकर यांची स्वरब्रह्म ही लौकिक प्राप्त संस्था वास्को वासियांचे ते भूषण आहे. दुर्गाकुमार नावती यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. लोककलाकार लाडू परवार यांचा अशोक परब यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्थेशी संबंधीत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या अखिल गोवा पातळीवरील अभंग गायन व फुगडी स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. अभंग गायन स्पर्धेत लवू गांवस, मनोज चौकुलकर व श्रेया तुयेकर यांना प्रथम क्रमांकाची अनुक्रमे तीन पारितोषिके प्राप्त झाली. शिवम पालयेकर, विघ्नेश सावंत, साईश शिंदे व अनंत शेटय़े यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. फुगडी स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्री पारवडेश्वर महिला मंडळ केरी सत्तरी, द्वितीय ब्राह्मण नरसिंह सातेरी चिखलकर महिला मंडळ चिखली वास्को तर तृतीय श्री बोडगेश्वर महिला फुगडी मंडळ म्हापसा यांना प्राप्त झाले.
श्री ब्राह्मणेश्वर फुगडी मंडळ वास्को, रघुगोनशेट महिला फुगडी मंडळ कोरगाव पेडणे, श्री सातेरी खामिणी महिला मंडळ बेतकी फोंडा, जागरेश्वर फुगडी मंडळ शिवोली, रघुगोनशेट कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पेठेचीवाडा कोरगाव, श्री सातेरी फुगडी मंडळ भोम व हेडलॅण्ड सडा वास्को फुगडी मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून दुर्गाकुमार नावती, दत्तू गांवस व लाडू परवार यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार संकल्प आमोणकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रवींद्रभवन वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव, मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष श्री. चोपडेकर, उमेश साळगावकर, परीक्षक व आयोजक उपस्थित होते. राजाराम गडकर यांनी स्वागत व उमेश साळगावकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू गडेकर यांनी केले.