लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पहिल्या दोन फेऱयांमध्ये सर्वात पुढे असणाऱया ऋषी सुनक यांना मागे हटविण्यासाठी हुजूर पक्षाच्या अन्य नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत सुनक यांचे स्थान आता निश्चित झालेले असल्याने त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धकही आता अधिक तयारीने शर्यतीत उतरतील अशी शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हुजूर पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ब्रिटनच्या या सर्वोच्च पदासाठी आता स्पर्धा तीव्र झाली आहे. सोनक यांनी पहिल्या दोन फेऱयांमध्ये आघाडी राखली आहे. आता त्यांना त्यांच्या पक्षातील पाच अन्य नेत्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. या पाचही नेत्यांमध्ये टीव्हीवरील चर्चांच्या अनेक फेऱया होणार असून त्यातून सुनक यांचा प्रतिस्पर्धी निश्चित होणार आहे. पहिल्या दोन फेऱयांमध्ये हुजूर पक्षाच्या संसद सदस्यांनी मतदान केले होते. या दोन्ही फेऱयांमध्ये सोनक यशस्वी ठरले होते.
सुनक यांना सर्वात तीव्र स्पर्धा विद्यमान व्यापार मंत्री पेनी मॉरडंट यांच्याकडून होत आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री केमी बडेनोच आणि खासदार टॉन टुजेंदट हे देखील स्पर्धेत आहेत. दुसऱया फेरीत एक स्पर्धक सुएल्ला ब्रव्हर्मन हे बाद ठरले आहेत. त्यामुळे आता सुनक यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी 5 जण मैदानात उरले आहेत. ब्रव्हर्मन यांनी आता तिसऱया क्रमांकावरील स्पर्धक लिझ ट्रस यांना आपले समर्थन घोषित केल्याने ते दुसऱया क्रमांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लिझ ट्रस हे कदाचित सुनक यांचे खरेखुरे प्रतिस्पर्धी ठरु शकतात, असे तज्ञांचे मत आहे. काही प्रतिस्पर्ध्यांनी सुनक यांना स्पर्धेत मागे टाकण्याचा चंग बांधला आहे. हे सर्व स्पर्धक एकत्रितरित्या ट्रस यांच्यामागे आपले बळ लावू शकतात. राजीनामा दिलेले पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे देखील सोनक यांच्यावर नाराज झाल्याचे बोलले जाते. सुनक यांनी आपला विश्वासघात केला, अशी जॉन्सन यांची भावना आहे. त्यामुळे ते सोनक यांच्या सर्वात तगडय़ा प्रतिस्पर्ध्याच्या पारडय़ात आपले वजन टाकतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सुनक सध्या जरी सर्वात पुढे असले तरी प्रत्यक्ष पंतप्रधान होण्यासाठी त्यांना अजूनही बरेच परिश्रम करावे लागणार आहेत, असे तज्ञांचे मत आहे.