पेपर मोठा असल्याने 15 मिनिटे अपुरी : विद्यार्थ्यांत रोष
बेळगाव : दहावीचा गणित विषयाचा पेपर झाला परंतु पेपर मोठा असल्यामुळे तो वाचण्यासाठी देण्यात आलेली 15 मिनिटे अपुरी ठरली. यामुळे काही विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पेपरचे काठिण्य पातळी व प्रश्न वाचण्यात अधिक वेळ गेल्याने नुकसान झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी मांडले आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून, सोमवारी गणिताचा पेपर पार पडला. 80 गुणांचा पेपर सोडविण्यासाठी तीन तास 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यातील 15 मिनिटे ही पेपर वाचण्यासाठी असतात. एकूण प्रश्नपत्रिका पाहता पेपर मोठा असल्यामुळे तो वाचण्यासाठी देण्यात आलेली 15 मिनिटे अपुरी पडली. यामुळे संपूर्ण पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना नियोजित वेळ कमी पडल्याची तक्रार पालकांनीही केली आहे. बेळगावच्या एका विद्यार्थिनीने थेट शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांना ट्विट करत आपली तक्रार मांडली आहे. गणिताचा पेपर सोडविण्यास तसा अधिक वेळ लागतो. त्यात जर प्रश्न मोठे असतील तर वेळेमध्ये वाढ होते. या सर्वांचा सारासार विचार करून प्रश्नपत्रिका काढणे गरजेचे होते. परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्याने काही विद्यार्थ्यांनी आपली तक्रार शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.