औरंगाबाद, पुणे / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला आहे. लाऊडस्पीकरवरून दहानंतर भाषण करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱयावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ासमोर रात्री 10 नंतर एका सभेला संबोधित केले होते. यासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर लावण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर न्यायालयाच्या या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी आनंद ज्ञानदेव कस्तुरे नामक एका सामाजिक कार्यकर्त्याने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिंदे यांनी 31 जुलै रोजी रात्री 10 वाजेनंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर लाऊडस्पीकरवरून भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर जमावही उपस्थित होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे व या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कस्तुरे यांनी आपल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला असून, अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
मी कायदा पाळणारा माणूस : मुख्यमंत्री
दरम्यान, पुण्यात याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण कायदा पाळणारा माणूस असल्याचे स्पष्ट केले. आपण जातो, तेथे गर्दी होते. लोक भूमिकेला पाठिंबा देतात, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
हेही वाचा : उदय सामंत हल्ला प्रकरण; शिवसेना शहरप्रमुखासह 6 जणांना अटक