धारगळ येथील जमीन बळकावल्याचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
मांद्रे मतदारसंघाचे मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात जमीन घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तक्रार दाखल केली आहे. सर्वे नंबर 481/0 धारगळ पेडणे येथील 1 लाख 48 हजार 800 चौरस मिटर जमिनीचे प्लाट करून बेकायदेशीररित्या विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ही जमीन दोघांच्या मालकीची आहे. म्हापसा येथील 76 वर्षीय रवळू खलप हे त्या जमिनीचे सहमालक आहेत. तसेच जमिनीची वाटणीही झाली नव्हती.
जीत आरोलकर यांनी सहमालकाला विश्वासात न घेताच परस्पर जमिनीचे सेलडीड करून जमिनीचा मालकी हक्क घेतला. नंतर त्या जमिनीचे प्लॉट करून त्यातील 200 प्लॉट विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असून एसआयटीला हवे असल्यास ते आपण सादर करायला तयार आहे, असे ऍड. आयरीश रॉड्रीग्स यांनी एसआयटीला सांगितले आहे. रॉड्रिग्स यांनी जमीन मालकाच्या वतीने आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
एसआयटीचे प्रमुख अधीक्षक निधीन वालसन यांनी सांगितले या तक्रारीबाबत सखोल तपास करून नंतर तक्रार नोंद करायची की नाही ते ठरविले जाईल.
नव्याने तक्रार सादर करून नेमके काय मिळाले : ढवळीकर
मांदेचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात अगोदरच ईडीकडे तक्रार आहे, आणि त्याप्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन प्राप्त झालेला आहे. असे असताना प्रकरण न्यायालयात असताना नव्याने तक्रार सादर करून नेमके काय मिळाले, असा सवाल मगो नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.
जीत आरोलकर यांना निवडणुकीपूर्वी राजकीयदृष्टय़ा त्रास करण्यात आला आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रकरण ईडीकडे पोहोचले. याप्रकरणी त्यांना अटक होणार होती मात्र त्यांनी जामीन प्राप्त केला. आता त्यांना राजकीयदृष्टय़ा त्रास देण्याचा आयरिश रॉड्रिग्ज यांचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल ढवळीकर यांनी केला. ईडीकडे तक्रार असूनदेखील मताधिक्मयाने जीत आरोलकर विजयी झाले आहेत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे असेही ढवळीकर म्हणाले.