कथित जमीन घोटाळा : बेहिशोबी मालमत्ता प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
कथित जमीन घोटाळा, बेहिशोबी मालमत्ता, करचुकवेगिरी यासारख्या विविध प्रकरणी मांद्रेचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जित आरोलकर यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालय, आयकर आणि सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सध्या कॅलिफोर्निया येथे राहणारे म्हापसा येथील 76 वषीय रवळू वैकुंठ खलप यांच्यावतीने ऍड. आयरीश रॉड्रिगीश यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यात आमदार आरोलकर यांचा कथित सहभाग असलेल्या जमीन घोटाळय़ांसंबंधी सखोल माहिती दिली आहे.
जमीन बळकावल्याचा दावा
तक्रारदार रवळू खलप यांची सहमालकी असलेली धारगळ पेडणे येथील सुमारे 1,48,800 चौरस मीटर जमीन आमदार आरोलकर यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचा दावा करण्यात आला आहे. जमिनीचे बेकायदेशीरपणे रूपांतर करण्यात आले व नंतर 200 पेक्षा जास्त भूखंड पाडून विकण्यात आले असा तक्रारदाराचा दावा आहे.
आरोलकर हे 2001 मध्ये पोलीस खात्यात शिपाई म्हणून रुजू झाले होते. परंतु जमीन घोटाळे आणि मनी लाँड्रिंगसारख्या प्रकरणांच्या माध्यमातून मोठी संपत्ती जमविल्यानंतर केवळ 10 वर्षांतच त्यांनी नोकरी सोडली होती, या गोष्टीकडे तक्रारदाराने अधिकाऱयांचे लक्ष वेधले आहे.
प्रतिज्ञापत्राची प्रतही सादर
दरम्यान, दि. 28 जानेवारी 2022 रोजी आरोलकर यांनी मांदे विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल करताना निर्वाचन अधिकाऱयांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रतही तक्रारदाराने अधिकाऱयांना दिली आहे. त्यात आरोलकर यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्राsतापेक्षाही मोठय़ा प्रमाणात संपत्ती जमा केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.
आरोलकर यांनी सध्या विद्यमान सरकारला पाठिंबा दिला असून राजकीयदृष्टय़ा वजनदार व्यक्तीमत्व आहे. तरीही ते कायद्यापेक्षा श्रेष्ट ठरू शकत नाहीत, असे नमूद करून आपल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कायद्यानुसार त्यांची चौकशी करावी, असे आवाहन रॉड्रिग्स यांनी केले आहे.