मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे तक्रार : पोलिसात तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना दिली माहिती
प्रतिनिधी/सातारा
आम्ही पालिकेकडून फोन आला की लगेच हजर होतो. कुठेही झाड पाडायचे असेल, फांद्या तोडायच्या असतील तर लगेच काम करतो. असे असताना आम्हाला मानधन मात्र कोणाला तीन हजार, कोणाला चार हजार, कोणाला दोन हजार देवून बोळवण केली जाते. प्रत्यक्षात आमचे मानधन हे जास्त आहे. आमच्या मानधनावर ठेकेदार डल्ला मारत आहे, अशी तक्रार वन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे केली असून फसवणूकीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकारांना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना हे म्हणाले, ठेकेदारांकडून आमची पिळवणूक केली जात आहे. प्रत्यक्षात आम्हाला मानधन फार तुटपूंजे दिले जाते. कामावर 50 जण असल्याचे दाखवून मानधन काढले जातात. मानधनातून पीएफ कट केला जातो. प्रत्यक्षात आमचा पीएफ खात्यावर भरला जातो का?, आमचे पूर्ण मानधन आम्हाला दिले जात नाही. ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात याचे कारण सांगून आमचे पैसे कट करतो. ही आमची फसवणूक आहे. ठेकेदार की अधिकारी आमच्या पैशावर डल्ला मारत आहेत. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निवेदन देताना, विशाल गुजले, आकाश बडेकर, दत्तात्रय देडगे, सुनील लाड, आदित्य कांबळे, सुरज बगडेकर, गणेश खुडे, महादेव सकटे आदी उपस्थिती होते.