जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : 61 जणांनी मांडले गाऱ्हाणे
बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुखांच्या फोन ईन कार्यक्रमामध्ये आता परराज्यातूनही तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. सोमवारी झालेल्या फोन ईन कार्यक्रमामध्ये पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी येथून तीन तक्रारी दाखल झाल्या. तर जिल्ह्यातून 49 आणि शहर-बेळगाव तालुक्यातून 9 तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्हा पोलीसप्रमुखांच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या फोन ईन कार्यक्रमात बेळगाव शहर व जिल्ह्यातून 61 जणांनी आपले गाऱ्हाणे मांडले. रस्ते दुरुस्ती, पैशांची देवाण-घेवाण याचबरोबर नाहक त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. चिकोडी तालुक्यातील जागनूर गावातील एका व्यक्तीने आपला पगार दिला नाही म्हणून तक्रार दिली आहे.
वाहने चालविताना अश्लिल गाणी जोरदारपणे लावली जात आहेत. शाळेच्या परिसरात असा प्रकार सुरू आहे. याचबरोबर ट्रॅक्टर चालकही मोठ्याने गाणी लावून वेगाने ट्रॅक्टर चालवत आहेत, अशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध तालुक्यांतील पोलीस स्थानकांना अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि इचलकरंजी येथील नागरिकांनी बेळगाव जिल्ह्यातील काहीजणांनी पैशांची फसवणूक केली आहे. ते पैसे परत मिळावेत, अशी विनवणी केली आहे. न्यायालयात खटला असताना जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले आहेत. वाळूसाठा करणे, मोबाईल चोरी, कौटुंबिक वाद, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतच्या तक्रारी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे करण्यात आल्या आहेत. शहरामधूनही रहदारीसंदर्भात, कौटुंबिक वाद, बेकायदेशीर दारूविक्री, मोबाईल चोरी, जमिनीचे वाद यासंदर्भात तक्रारी सांगण्यात आल्या. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी तक्रारी ऐकून संबंधितांना सूचना केल्या आहेत.