प्रतिनिधी / बेळगाव
जीएसएस महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या दोन सर्टिफिकेट्स कोर्सचा समारोप नुकताच पार पडला. विभागप्रमुख डॉ. संदीप देशपांडे यांनी स्वागत केले व सॉईल ऍनालिसीस कोर्ससाठी 45 विद्यार्थ्यांनी तर फौंड्री इंडस्ट्रीज कोर्ससाठी 55 विद्यार्थ्यांनी लाभ घेतल्याचे सांगितले.
या अंतर्गत विद्यार्थ्यांना मातीचे विविध प्रकार आणि तिचा पोत याबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या आजुबाजूला नैसर्गिकरीत्या कोणकोणती जैविक खते उपलब्ध आहेत, हे शिकविण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी बेळगाव आणि परिसरात शेती मोठय़ा प्रमाणात असल्याने सॉईल ऍनालिसीस कोर्सची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.
बेळगाव हे फौंड्री उद्योगासाठी प्रसिद्ध असून येथे ऑटोमोबाईलचे निरनिराळे भाग तयार केले जातात. कॉलेज व्यवस्थापन समितीचे चेअरमन शरद वालावलकर यांच्या संकल्पनेतूनच हा कोर्स सुरू झाल्याचे सांगितले.
यावेळी रोहन शेलार, वैष्णवी चौगुले, काजल भाटी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शरद वालावलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन चारुशीला बाळेकाई यांनी केले.