मतदारांतून नाराजी : आयोगाने सूचना करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
नवीन देण्यात येणारे मतदानकार्ड अत्यंत किचकट आहे. त्यामुळे अनेकांना कार्डामध्ये आपले नाव कोठे आहे, गाव कोठे आहे, हे शोधावे लागत आहे. सुटसुटीत मतदानकार्ड हवे होते. मात्र देण्यात येणारे हे कार्ड अत्यंत किचकट असल्यामुळे मतदारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मतदानकार्ड काही वर्षानंतर नव्याने घ्यावे लागते. त्यामुळे अनेकजण मतदान कार्डसाठी अर्ज करत आहेत. मात्र आता देण्यात येणाऱ्या मतदान कार्डावर नावाची नोंद तसेच कार्डावर करण्यात आलेली डिझाईन आणि रंग यामुळे या कार्डवरील नाव शोधताना अवघड जात आहे. तेव्हा या मतदान कार्डावर छायाचित्राबरोबर योग्यप्रकारे मजकूर मोठ्या अक्षरात आणि सुटसुटीत लिहावा, अशी मागणी होत आहे.
आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मतदानकार्ड तसेच मतदारयाद्यांची नोंदणी करण्यात येत आहे. मतदानकार्ड काही दिवसांतच दिले जात आहे. मात्र मतदानकार्डवरील करण्यात येत असलेला उल्लेख हा केवळ कन्नड आणि इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला समजणेदेखील अवघड झाले आहे. तेव्हा निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन चांगल्या प्रतिचे कार्ड तसेच त्यावर नोंद करण्यात आलेला सर्व मजकुर सुटसुटीत लिहावा, अशी मागणी होत आहे.