Tarun Bharat

कामचुकार सरकारी कर्मचाऱयांना सक्तीची निवृत्ती…

Advertisements

गोव्यात सरकारी नोकरी प्राप्त करण्याची जणू एक स्पर्धाच आहे. सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये मोजावे लागले तरी कर्ज काढूनदेखील पैशांची व्यवस्था करणारी मंडळी या ठिकाणी आहे. पैसे मोजून किंवा राजकीय वशिल्याने एकदा का सरकारी नोकरी मिळाली की, त्या नोकरीचे गांभीर्य कुणालाच नसते आणि त्यातूनच कामचुकारपणा सुरू होतो. अशा कामचुकार सरकारी विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत सर्वसामान्य जनतेकडून होणे स्वाभाविक होते कारण सरकारी कार्यालयात आपली कामे घेऊन जाणाऱया सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना साध्या कामांसाठीही कार्यालयांमध्ये खेपा माराव्या लागत होत्या. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत हे अपेक्षित होतेच. कामचुकार कर्मचाऱयांना सक्तीची निवृत्ती, या निर्णयाला सरकारी कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.

सरकारी खात्यातील सर्वच अधिकारी किंवा कर्मचारी हे कामचुकार आहेत असे म्हणता येणार नाही. बरेच कर्मचारी हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक असतात. लोकांना मदत करण्यात ते तत्पर असतात. एखादे काम पूर्ण करण्यासदेखील मदत करतात मात्र बहुतांश कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, असा अनुभव अनेकांनी आजवर घेतलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कामचुकार वृत्तीचा अंदाज आल्याने किंवा त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्याने त्यांना सक्तीच्या निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. नागरिकांच्या कल्याणासाठी आवश्यक असल्यास सरकारी कर्मचाऱयाला सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा अधिकार घटनेच्या 56 (जे) मध्ये दिला आहे. सरकार हा निर्णय कसा पुढे नेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कामचुकार अधिकारी व कर्मचाऱयांना सक्तीने सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडताना कर्मचाऱयांच्या संघटनेला विश्वासात घेतले जाणार असल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणाला आपला सूड घेतला, असे म्हणण्याची संधी मिळणार नाही, हे यातून स्पष्ट होते.

कोणताही कर्मचारी एखाद्या पदावर प्रभावीपणे काम करणार असेल तर काही घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक म्हणजे कर्मचाऱयाची निवड त्याच्या पात्रतेवर आधारित असणे आवश्यक आहे पण प्रत्यक्षात सरकारी नोकऱयांचा विचार केला तर वास्तव हेच आहे की, जो लायक नाही, त्याला निव्वळ संपत्ती किंवा पैशांच्या जोरावर सरकारी नोकरी मिळते. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या मतदारसंघात एवढय़ा नोकऱया दिल्या, असे जेव्हा एखादा आमदार किंवा मंत्री म्हणतो तेव्हा तो उघडपणे कबूल करतो की, गोव्यातील सरकारी खात्यांतील नोकऱया गुणवत्तेवर भरल्या जात नाहीत. गुणवत्तेवर आमदार किंवा मंत्री भर देत नाही. आपल्या मतदारसंघातील लोकांना जास्तीत जास्त नोकऱया द्यायच्या व निवडणुकीची गणिते त्यातून मांडायची. जेव्हा गुणवत्तेवर उमेदवार निवडले जातील, तेव्हाच कामकाजात सुरळीतपणा येईल. 

सरकारी कार्यालयात बसून सर्वसामान्य नागरिकांना धमक्मया देणारे महाभाग या ठिकाणी कमी नाहीत. आपण या मंत्र्याचा किंवा आमदाराचा माणूस आहे. आपले कुणी काही बिघडवू शकत नाही, अशी जी मस्ती त्यांच्या अंगात भिनली आहे, ती सक्तीच्या निवृत्तीच्या निर्णयाने जिरणार की, तशीच कायम राहणार, हे येणाऱया काळात स्पष्ट होईलच.

कामचुकार अधिकारी व कर्मचाऱयांवर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करताना ते कोणत्या मतदारसंघातील व त्यांना कोणी नोकरीत सामावून घेतले होते, हे जाहीर करावे जेणेकरून भविष्यात कामचुकार वृत्तीला लगाम बसेल तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिकपणे ते सेवा करतील.

प्रभावी कामासाठी दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, कामाला चालना देणारे कार्यालयीन वातावरण. गोव्यातील काही मोजक्मया सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता बहुतांश कार्यालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. भिंतींना वर्षानुवर्षे रंग दिसला नाही, जुन्या फाईल्स इकडे-तिकडे पडून आहेत, ऑफिसच्या फर्निचरची दुरवस्था, आवश्यक दिव्यांचा अभाव-पंखे यामुळे निस्तेज, अंधार, आळशी, उदास वातावरण आहे. पावसाळय़ात अनेक कार्यालयांना गळती लागल्याचे दिसून येते. सरकारी विभागांनी कामासाठी आनंददायी वातावरण निर्माण केले पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱयाची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. लोकांशी सातत्यपूर्ण व्यवहार कसे करायचे आणि लोकांची कामे लवकर कशी पार पाडायची, याचे प्रशिक्षण कार्यक्रम सरकारी कर्मचाऱयांसाठी घेण्यात यावेत.

परिणामकारक कामासाठी तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, चांगल्या कामाची स्तुती करणे. कामचुकार कर्मचाऱयांवर कारवाई करताना चांगले काम करणाऱया कर्मचाऱयांच्या चांगल्या कामाची दखल घेतली पाहिजे. त्यांच्या कामाची ओळख म्हणून त्यांना काम करण्यास प्रोत्साहित करून इतरांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अनेक सरकारी जावई पाहतो, जे वर्षानुवर्षे एकाच जागी काम करतात किंवा एखाद्याचा जावई सेवेत रुजू होताच कामावर हजर न होता पगार घेतो. काहीजण दीर्घ पल्ल्याची रजा घालून विदेशात नोकरीसाठी जातात. त्यांचाही शोध घेतला पाहिजे. सरकारी नोकऱया म्हणजे आयुष्यभर काम न करता उदरनिर्वाहाची संधी आहे, ही बहुसंख्य कर्मचाऱयांची मानसिकता. ती बदलण्यास मदत होईल.

महेश कोनेकर

Related Stories

बळिराजा अडकला लालफितीत

Amit Kulkarni

अंतिम सत्रातही सेन्सेक्स 303 अंकांनी तेजीत

Patil_p

श्रीराम कथा

Patil_p

तरुणांची आर्त विनंती

Patil_p

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राला कर्जाचे वंगण

Tousif Mujawar

वीज बिल सवलतीने वर्षपूर्ती व्हावी!

Patil_p
error: Content is protected !!