नेत्रदिव्यांगांना (अंध व्यक्ती) सहजगत्या उपयोगात आणता येईल, असा संगणक संशोधकांनी निर्माण केला आहे. हा संगणक बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि आयआयटीच्या वैज्ञानिकांनी बनविला आहे. बोटांच्या संकेतावर या संगणकाचा कि-बोर्ड वापरता येतो. बोटांचे संकेत उमगणारी एक यंत्रणा या संशोधकांनी तयार केली आहे. त्यामुळे दृष्टीबाधित किंवा अंध व्यक्ती सामान्य माणसाइतक्मया वेगाने संगणकावर टायपिंग करू शकतात. साईन लँग्वेज टेक्नॉलॉजी किंवा डेक्टिलोलॉजी या तंत्राचा उपयोग करून ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
अंध व्यक्तींना अवगत असणाऱया ब्रेल लिपीशी ही यंत्रणा संलग्न आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही अशाप्रकारच्या तंत्रज्ञानापेक्षा हे नवे संशोधन अधिक प्रभावी आणि वेगवान आहे. या तंत्रज्ञानाचे परीक्षण दुर्गाकुंड येथील श्री हनुमानप्रसाद अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले असून ते यशस्वी झाले आहे. ब्रेल लिपीपेक्षाही डेक्टिलोलॉजी हे तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि सोपे आहे. यामध्ये चुका होण्याची शक्मयता जवळपास नसते. तसेच बुद्धिवरही अधिक ताण येत नाही. या तंत्रज्ञानाच्या संशोधकांमध्ये डॉ. किशोर सावर्डेकर या मराठमोळय़ा व्यक्तीचाही समावेश आहे. याशिवाय डॉ. तुषार सिंग, डॉ. गौरव मोदनवाल इत्यादी संशोधकांनी परिश्रमपूर्वक हे तंत्रज्ञान साकारले आहे. दृष्टीबाधित किंवा अंध व्यक्ती कि-बोर्ड किंवा माऊस चालवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ब्रेल आधारित साधन निर्माण करण्यात आले आहे. तथापि, ते विशेष प्रभावी नाही. त्यामुळे त्या तंत्रज्ञानातील त्रुटी दूर करून हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, असे डॉ. किशोर सावर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे. आता या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ते दृष्टीबाधितांमध्ये लोकप्रिय होईल, असा विश्वास या तंत्रज्ञानाच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.