Tarun Bharat

कला मंदिरमध्ये स्वरमैफलींची बरसात

Advertisements

पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाला शानदार सुरुवात

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

 तरंगिणी प्रतिष्ठान आयोजित पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाला शनिवारपासून फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये शानदार सुरुवात झाली. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

 कानसेन आणि गानसेन जिथे एकत्र येतात, तिथे सूर साम्राज्याची सुरुवात होते. नादब्रह्माचा ध्यास घेऊन खडतर साधनेच्या बळावर ज्यांनी संगीत क्षेत्रात नाव लौकिक प्राप्त केला, त्या पं. जितेंद्र अभिषेकी यांना स्वरयज्ञाच्या माध्यमातून स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते, असे उद्गार मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी बोलताना काढले. पं. अभिषेकीबुवांनी संगीत क्षेत्राची निरपेक्ष सेवा तर केलीच, परंतु प्रज्ञावंत, नामवंत शिष्यही घडविले. आज त्यांचा शिष्यवर्ग आपली संगीत कला गुरुवर्यांना समर्पित करतात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. बुवांनी संपूर्ण जगात किर्ती मिळविली. गोव्याच्या या गानसुपूत्राची जागा घेणे कठीण आहे. त्यामुळे असे पं. जितेंद्र अभिषेकी पुन्हा होणे नाही, असेही त्यांनी नमूद केले. उद्घाटन सोहळय़ाला व्यासपीठावर तरंगिणी प्रतिष्ठानचे प्रमुख पं. शौनक अभिषेकी, पद्मश्री विनायक खेडेकर, माजी मंत्री तसेच पंडितजींचे शिष्य विनोद पालयेकर, अमर पंडित, मंगेश मुळे, मोहनदास बखले कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले.

पं. विजय कोपरकरांनी आळविला राग वसंतमुखारी

 पं. अभिषेकींचे शिष्य व नामवंत गायक पं. विजय कोपरकर सकाळच्या चौथ्या सत्रात भैरव थाटातील अत्यंत क्लिष्ट तेवढाच मधूर असा असा प्रातःकालीन राग ‘वसंतमुखारी’ सादर केला. या रागातील बारकावे अत्यंत सुलभपणे सादर करीत रागदारीवरील आपले कंठप्राबल्य दाखवून दिले. राग सादरीकरणातील स्वरांचे अभिसरण आणि त्याच्या माध्यमातून उमटणारे मधूर भाव पर्यायाने अमूर्त आणि अनाहत नादश्रवणाची अनुभूती त्यांच्या रंजक अशा गायकीतून रसिकांना मिळाली. बंदिशीतील आलापी, ताना, सरगम, बोलताना या बरोबरच कंठस्वरांच्या कौशल्यपूर्ण आळवणी वसंत ऋतुतील वातावरणाची झलक त्यांच्या सादरीकरणात प्रामुख्याने जाणवली. त्यानंतर भैरवी रागातील एक प्रचलीत रचना पेश करुन त्यांनी या सत्राची सुरेल सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर तर संवादिनीवर राया कोरगावकर यांनी साथ केली.

 सकाळच्या पहिल्या सत्रात गोमंतकीय उदयोन्मुख गायक विश्वजित मेस्री यांनी प्रभातकालीन राग ‘तोडी’ सादर केला. स्वरांच्या नादाला बंदिशीच्या रचनेची अचित जोड देत, त्यांनी केलेली बढत श्रोत्यांच्या प्रशंसेस पात्र ठरली. शेवटी एक नाटय़गीत सादर करुन त्यांनी आपली मैफल आटोपली. त्यांना तबल्यावर विठ्ठल मेस्री तर संवादिनीवर प्रसाद गावस यांनी जमून साथ दिली. समीक्षा भोबे या प्रथितयश गोमंतकीय गायिकेने प्रभातकालीन राग ‘अहिर भैरव’ सादर केला. मनोहारी स्वरलगाव आणि रागप्रकृतीस अनुकुल अशी बढत करीत त्यांनी आपल्या गाण्यात रंग भरला. बंदिशीमधून भावांग, क्रियांग व रागांग यांचा यथायोग्य वापर करुन रागदारीतील छटांचे विविध रंग तिने रागप्रस्तुतीत दाखविले. त्यांना तबल्यावर प्रेमानंद आमोणकर तर संवादिनीवर सुभाष फातर्पेकर यांनी उचित साथसंगत केली.

 निनाद दैठणकर यांचे रंगतदार संतुरवादन

सकाळच्या तिसऱया सत्रात निनाद दैठणकर यांचे संतुरवादन झाले. त्यांनी राग चारुकेशी हा संपूर्ण राग सादर केला. स्वर आणि लय यातील द्रष्टेपणा आणि रसनिर्मितीची क्रिया त्यांनी अत्यंत सफाईदारपणे मांडली. स्वरांची चैतन्यशिलता आणि रंजकता याचे उत्तम उदाहरण त्यांच्या मैफलीतील सादरीकरणातून रसिकांना अनुभवास आली. परिणामी रसिकांचे कान तृप्त करण्याची किमया त्यांच्या संतुरवादनाने साधली. त्यांना तबल्यावर मयांक बेडेकर यांनी तोलामोलाची साथ दिली.

 दुपारच्या सत्रातील पहिली बैठक सचिन नेवपूरकर यांच्या गायनाने झाली. वर्षा ऋतुतील वैशिष्टय़पूर्ण राग सूरमल्हार त्यांनी अत्यंत सफाईने सादर केला. राग सारंग आणि मल्हार यांच्या सुरेख मिलाफाच्या छटा उमटवित काफी धाटातील या राग सादरीकरणाने श्रोत्यांना त्यांनी मनमुराद आनंद दिला. सूरदासांनी या रागाची निर्मिती केल्याचे संदर्भ संगीतशास्त्रच्या इतिहासात सापडतात. प्रबळ कंठगायकीचा उत्कृष्ट नमुना त्यांनी आपल्या मैफलीतून पेश केला. त्यांना तबल्यावर रोहिदास परब तर संवादिनीवर दत्तराज म्हाळशी यांनी पोषक साथसंगत केली.

नबदिता चौधरी यांनी आळविला राग मधुवंती

 त्यानंतर नबदिता चौधरी यांनी राग मधुवंती सादर करुन संगीत महोत्सवात बहर आणली. स्वरसौंदर्य, स्वरमाधुर्य आणि सादरीकरणतील गांभीर्य या भावनांचे उद्दिपन याची प्रचिती त्यांच्या कंठगायकीतून मिळाली. आपले गाणे दमदार करण्यासाठी त्यांचा कटाक्ष जाणवला. त्यांना तबल्यावर विभव खांडोळकर यांची उत्स्फूर्त व तेवढीच आवेशपूर्ण व प्रभावी साथ लाभली. संवादिनीवर दत्तराज सुर्लकर यांनी साथसंगत केली.

ओंकार ओक यांच्या बासरीवादनातून स्वरमाधुर्याची पर्वणी

 पुढील सत्रात ओंकार ओक यांनी बासरीवादन केले. त्यांनी बिलावल थाटातील ओढव जातीचा राग दुर्गा सादर केला. प्रभावी विस्तार आणि रागातील बारकावे पेश करीत त्यांनी स्वरमाधुर्याची पर्वणी रसिकांनी दिली. त्यांना तबल्यावर मयांक बेडेकर यांची समर्पक साथ मिळाली. त्यानंतरच्या सत्रात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायिका श्रृती सडोलीकर यांचे गायन झाले. त्यांनी राग बागेश्री कानडा व राग गौड मल्हार आळविला. उचित रसोत्पत्ती, सुसंगत तेवढीच मनोहारी बढत, लयबद्धता आणि परिणामकारक विस्तार यामुळे त्यांचे गायन श्रवणीय झाले. त्यांना तबल्यावर मंगेश मुळे तर संवादिनीवर सुधीर नायक यांनी प्रभावी साथसंगत केली. 

Related Stories

काजू उत्पादकांना सरकारने दिलासा द्यावा : आमदार दिव्या राणे

Amit Kulkarni

पंचायतींनी वर्षभरात चार ग्रामसभा घ्याव्यात

Amit Kulkarni

एलएलएम परीक्षेत राधा नाईकला सुवर्णपदक

Patil_p

‘भारत माता की जय’तर्फे म्हादईमाता पूजन अभियान

Patil_p

कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटकांमुळे गोव्याला धोका

Patil_p

साखळी बाजारातील हॉटेलमध्ये आग लागल्याने लाखेंचे नुकसान

Omkar B
error: Content is protected !!