भाविकांनी घेतला देवीच्या दर्शनाचा लाभ
वार्ताहर /सांबरा
मुतगा येथील ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेची रविवारी सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे यावषी भाविकांची यात्रेला गर्दी जास्त होती. शुक्रवारपासूनच यात्रेसाठी भाविक दाखल होत होते. दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी मेन रोड नजीकच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर व मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानावर सोय करण्यात आली होती. मुतग्याला येण्यासाठी या मार्गावरील सर्व बसफेऱयांचा भाविकांना लाभ झाला. भाविकांची गर्दी जास्त असल्याने भाविक मिळेल त्या वाहनाने गावात दाखल होत होते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्राकाळात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे समजते.