प्रतिनिधी /बेळगाव
बैलहोंगल-बेळगाव बसमध्ये विद्यार्थी आणि बसवाहकामध्ये बसपासवरून वाद निर्माण झाला. दरम्यान विद्यार्थ्यांनी अर्धा तास बस रोखून धरून आंदोलन छेडले. महाविद्यालयीन अंतिम वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या जुन्या बसपासची मुदत वाढविण्यात आली आहे. ही कल्पना बसवाहकाला नसल्यामुळे हा वाद चिघळला होता. दरम्यान परिवहन नियंत्रक पी. वाय. नाईक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. शिवाय वाहकालादेखील समज दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
परिवहनने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीखातर अंतिम वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी जुन्या बसपासची मुदत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थी जुना बसपास दाखवून विनामूल्य प्रवास करू शकतात. मात्र याबाबत बसवाहकाला कल्पना नव्हती. दरम्यान विद्यार्थ्यांनी जुन्या बसपासची मुदत वाढविली असल्याचे सांगितले. मात्र बसवाहक ‘तिकीट काढूनच प्रवास करा’, असा सल्ला देत होता. यावरून विद्यार्थी आणि बसवाहकामध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान परिवहनच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन समजूत काढली. शिवाय बसवाहकाला जुन्या बसपासची मुदत वाढविली असल्याचे सांगितले.