करमाळा/प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या परीक्षा सुरु असताना पहिल्या १५ मिनिटातच सुमारे १०० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पथकाने जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. केवळ प्रश्नपत्रिकेवर टीक केली म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गोंधळ घालायला सुरुवात करत. पुन्हा परीक्षेला बसायला परवानगी द्यावी अशी मागणी केली.
सध्या विद्यापीठाची परीक्षा सुरु आहे. शनिवारी (ता. १६) तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचा तिसरा पेपर सुरु होता. शनिवारी ११ ते १२ या वेळेत ‘सहकार’ विषयाची परीक्षा होती. विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका दिल्यानंतर पहिल्या १५ मिनिटात ही कारवाई झाली असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.