Tarun Bharat

टाकाऊ मातीसंदर्भात बैलूर ग्रा.पं.मध्ये गोंधळ

Advertisements

फौंड्रीतील टाकाऊ मातीमुळे पिकांचे नुकसान : अध्यक्ष-पीडीओ यांचा मनमानी कारभार : सदस्यांनी दिले ग्रा. पं. ला निवेदन

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी

फौंड्रीमधील टाकाऊ माती टाकण्यासंदर्भात बैलूर ग्राम पंचायतीमध्ये सावळा-गोंधळ निर्माण झाला आहे. सोनारवाडीजवळील शेतकऱयाच्या खासगी जागेत ही माती टाकण्यात येत आहे. यामुळे आजुबाजूची पिके खराब होत आहेत. माती टाकण्यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष व पीडीओ यांनी सदस्यांना विश्वासात न घेता परवानगी दिली आहे, अशी तक्रार इतर सदस्यांनी केली. याची चौकशी करून योग्य तोडगा काढण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन बैलूर ग्रा. पं. ला बुधवारी देण्यात आले.

सर्व सदस्यांना विश्वासात न घेता ठराव मंजूर करून चुकीचा ठराव नंबर घालून परवानगी दिली आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. सध्याचे पीडीओ संतोष चौगुले यांना निवेदन देण्यात आले.

सोनारवाडी येथील शेतकऱयाने आपल्या खासगी जागेत टाकाऊ माती टाकण्यासाठी ग्रा.पं.कडे परवानगी मागितली होती. यावेळी टाकाऊ मातीमुळे इतर शेतकऱयांना त्रास होईल व पिकांचे नुकसान होईल, असे म्हणून काही सदस्यांनी याला विरोध दर्शविला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये माती टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली. सदर निवेदनात मासिक बैठकीची तारीख व ठराव नंबरही नमूद करण्यात आला आहे. माती टाकण्यासाठी ट्रक व अवजड वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे कुसमळी-बैलूर संपर्क रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. शेतकऱयांनी आम्हा सदस्यांना याबाबत विचारले असता आम्ही याची पडताळणी केली. तसेच गेल्या दि. 6 ऑगस्ट रोजी माती टाकणाऱयांना बैलूर ग्रा. पं. कार्यालयामध्ये बोलावून माती टाकणे बंद करा, असे सांगितले होते. तरीही पुन्हा टाकाऊ मातीच्या गाडय़ा सुरूच आहेत. याबद्दल सखोल चौकशी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनावर रामलिंग मोरे, प्रदीप कवठणकर, लक्ष्मण बन्नर, विठ्ठल नाकाडी, गंगाराम पाटील, आरोही सावंत, सखुबाई पाटील, गीता जांबोटी, मीनल कांबळे, रेणुका सुतार आदी सदस्यांच्या सहय़ा आहेत.

ग्रा. पं. मधूनही परवानगी मिळविली

परवानगी देतेवेळी दुसरे पीडीओ बैलूर ग्रा. पं. मध्ये होते. निवेदनात वडगावकर असा उल्लेख आहे. सध्याचे पीडीओ संतोष चौगुले यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

आधी मूलभूत सुविधा पुरवा

बैलूर ग्राम पंचायतीमध्ये बैलूर, उचवडे, तीर्थकुंडये, कुसमळी, सोनारवाडी, मोरब व देवाचीहट्टी या गावांचा समावेश आहे. एकूण 16 सदस्यसंख्या आहे. या ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी सामंजस्यपणे निर्णय घ्यावेत. तसेच येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील गावांचा विकास करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

अवजड वाहनांच्या वर्दळीने रस्ता खचला

बैलूर ग्राम पंचायत अध्यक्ष व तेव्हाच्या पीडीओ यांनी सदस्यांना विश्वासात न घेता फौंड्रीतील काळी माती टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. सदर जमीन खासगी आहे. ट्रक व मोठी अवजड वाहने ही वाळू घेऊन जात असल्यामुळे बैलूर-कुसमळी संपर्क रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. आता या रस्त्याकडे लक्ष कोण देणार? मातीमुळे शेतातील पिके खराब होऊ लागली आहेत. माती टाकण्यासाठी कोणत्या आधारे परवानगी दिली. या प्रकरणाचा योग्य तो तोडगा काढण्यात यावा.

– अनंत सावंत, कुसमळी

कारवाई योग्य प्रकारे झाली पाहिजे

ग्रा. पं. मधील अन्य सदस्यांना अंधारात ठेऊन टाकाऊ माती टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. याला या आधीचे अध्यक्ष व पीडीओ जबाबदार आहेत. सदस्यांना अंधारात ठेवून ठराव पास करून ठराव नंबरही चुकीचा दिला आहे. याला आम्हा सर्व सदस्यांचा आक्षेप आहे. वास्तविक कोणताही ठराव सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मंजूर करणे बंधनकारक आहे, पण या ग्रामपंचायतीमध्ये तसे झाले नाही. यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.

– रामलिंग मोरे, बैलूर ग्रा. पं. सदस्य

माती टाकण्यासाठी परवानगी कुणी दिली? 

सोनारवाडी येथील शेतकऱयाच्या खासगी जागेत फौंड्रीतील टाकाऊ माती टाकण्यात येत आहे. या भागातील शेतकरी आम्हा सदस्यांकडे तक्रार करीत आहेत की, ही माती टाकण्यासाठी परवानगी कुणी दिली? त्याचे उत्तर आम्ही शेतकरी देऊ शकत नाही. कारण या प्रकरणाबद्दल आम्हालाच काही माहिती नाही. शेतकऱयांनी विचारल्यानंतर आम्ही याची पाहणी करून चौकशी केली आहे. मागील अध्यक्षांनी घोळ निर्माण केला आहे. शेतकऱयांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.

– गंगाराम पाटील, ग्रा. पं. सदस्य, मोरब,

Related Stories

शिपायाच्या मुलीने सायन्स विभागात मिळविले 96 टक्के

Patil_p

बेळगाव शहरात 104 नवे बाधित

Patil_p

मिरवणूक नाही तरीही 12 तास चालले विसर्जन

Patil_p

खनिज मालमत्तांच्या सर्वसमावेशक सर्व्हेचा निर्णय

Omkar B

खानापूर ते सुवर्णविधानसौध संघर्ष पदयात्रा काढणार

Amit Kulkarni

जि. पं. आवारात साकारणार सुसज्ज वाहनतळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!