मुख्यमंत्री बसवराज बोम्माई ( CM Bommai ) हे राज्यात फॉक्सकॉनच्या (Foxconn) गुंतवणुकीवर केवळ प्रसिद्धीचा स्टंट करत असल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेसने (Congress) रविवारी केला. मुख्यमंत्री बोम्माई यांच्या हेतूवरही कॉंग्रेस पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते कर्नाटकातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) चे प्रवक्ते प्रियांक खरगे (Priyank Kharge) टि्वटरवर या सोशल मीडियावर म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकमधील लोकांची दिशाभूल करत आहे का? आपल्या प्रसिद्धीचा स्टंट करून मुख्यमंत्री बोम्माई एवढी मोठी गुंतवणूक का धोक्यात घालत आहेत? शक्यतो अंतिम करारावर स्वाक्षरी होईपर्यंत गुंतवणूकदार कमालीची गुप्तता पाळत असतात.”
प्रवक्ते खरगे यांनी AFP अहवालाचा हवाला देखील दिला ज्यामध्ये कंपनीने म्हटले आहे की, “फॉक्सकॉनने या प्रवासादरम्यान नवीन गुंतवणुकीसाठी बंधनकारक, निश्चित करार केलेले नाहीत. वाटाघाटी आणि अंतर्गत पुनरावलोकन चालू आहे. मीडियामध्ये चर्चा केलेली आर्थिक गुंतवणूक ही फॉक्सकॉनद्वारे जाहीर केलेली माहिती नाही.”
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी यासंबंधी ट्विट केले आहे की, “Apple कंपनी राज्यातील एका नवीन प्लांटमध्ये आयफोन तयार करून सुमारे 100,000 नोकऱ्या निर्माण करेल.” फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक आणि Apple iPhones ची प्रमुख असेंबलर आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सुमारे 300 एकर जमीन कंपनीला दिल्याची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली होती.
पण फॉक्सकॉनने यापुर्वीच स्पष्ट केले आहे की, 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत चेअरमन आणि सीईओ यंग लिऊ यांच्या भारत भेटीदरम्यान कोणतेही करार झाले नसल्याचे एएफपीचा अहवाल देऊन म्हटले असल्याचे प्रयांक खरगे यांनी म्हटले आहे.