समर्थनगर-हिंडलगा येथील कंत्राटदार आत्महत्या प्रकरण : विशेष विमानाने येवून कुटुंबीयांचे केले सांत्वन
प्रतिनिधी /बेळगाव
समर्थनगर-हिंडलगा येथील कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक बनले आहे. ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली असून बुधवारी सायंकाळी काँग्रेसच्या डझनभर नेत्यांनी त्या कंत्राटदाराची आई व पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, पक्षाचे कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, माजी मंत्री एम. बी. पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, ईश्वर खंडरे, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, सलीम अहम्मद आदी नेत्यांनी कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची बिले मिळाली नाहीत, बिले देण्यासाठी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत कंत्राटदार युवकाने उडुपी येथे आत्महत्या केली होती. काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून विशेष विमानाने काँग्रेस नेते बुधवारी बेळगावात दाखल झाले. त्यांनी संतोष यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून धीर दिला.
सरकारने मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना त्वरित अटक करावी, त्या कंत्राटदाराच्या कुटुंबीयांना 1 कोटीची भरपाई द्यावी, त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी, त्याने केलेल्या कामांची बिले त्वरित द्यावीत, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने जर नोकरी दिली नाही तर काँग्रेस नेत्यांच्या आस्थापनात नोकरी देण्याची तयारीही पक्षाने दर्शविली असून लवकरच या कुटुंबीयांना कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्यावतीने 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे, असे डी. के. शिवकुमार यांनी
सांगितले.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही ईश्वरप्पा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संबंधित मंत्र्यांना न सांगता सरकारी कामे करता येत नाहीत. वर्क ऑर्डर दिले नसले तरी तोंडी सांगितल्यामुळेच कामे सुरू केली जातात. कामे सुरू असतानाच त्यांना का अडविला नाही, असा प्रश्न उपस्थित करून ईश्वरप्पा यांना त्वरित अटक करावी. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या कुटुंबासोबत काँग्रेस पक्ष उभा राहणार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या मुद्दय़ावर राजकारण करण्यासाठी आम्ही येथे आलो नाही. संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यभरात 40 टक्क्मयाच्या मुद्दय़ावरून आठवडाभर आंदोलन छेडण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला आहे.
मृतदेह आज बेळगावात
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृतदेहावर मणिपाल इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गुरुवारी सकाळी मृतदेह बेळगावला येणार आहे. या पार्श्वभूमीवर समर्थनगर, हिंडलगा येथील त्यांच्या घराजवळ बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी बंदोबस्ताची तयारी केली आहे.