Tarun Bharat

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा समाप्त

राहुल गांधींनी गृहमंत्र्यांना काश्मीरपर्यंत पायी प्रवास करण्याचे दिले आव्हान

श्रीनगर / वृत्तसंस्था

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची रविवारी काश्मीरमध्ये सांगता करण्यात आली. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या यात्रेचा परिणाम तसेच यशाची माहिती दिली. भारत जोडो यात्रेला देशात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. या यात्रेच्या माध्यमातून एकतेसाठी मजबूत संदेश देण्यात आला. काही पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी विरोधक नक्कीच एकत्र येतील असा आशावाद व्यक्त केला. तसेच ‘भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सुंदर अनुभव असल्याचे सांगत त्याचा भारतीय राजकारणावर प्रभाव पडेल’, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

गेल्यावषी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे सुरू झालेल्या यात्रेच्या शेवटच्या पदयात्रेचा दिवस म्हणून राहुल गांधी यांनी शहरातील लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावला. तिरंगा फडकवल्यानंतर राहुलची भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला संपणार होती. मात्र, लाल चौकातील कार्यक्रमानंतर यात्रा मागे घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस कार्यालयात सोमवारी होणारा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. भारत जोडो यात्रेला लोकांचा उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळाले. 5 महिन्यांच्या या दौऱयाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल, पण तो काय असेल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत बोलताना मी जी स्थिती अनुभवली त्यावर मी खूश नाही. खोऱयातील सुरक्षेच्या परिस्थितीवरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. खोऱयातील परिस्थिती एवढी चांगली असेल असा भ्रम असल्यास भाजपचा कोणी नेता किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः जम्मू ते काश्मीर पायी यात्रा करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

लाल चौकात तिरंगा फडकवला

राहुल गांधी यांनी रविवारी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. सुरक्षा कर्मचाऱयांच्या गाडीतून ते लाल चौकात पोहोचले. याप्रसंगी त्यांच्यासोबत बहीण प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. लाल चौकात तिरंगा फडकवताना मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला होता. राहुल गांधींसोबत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांचा सहभागही दिसून येत होता.

तर ‘370’ पुन्हा लागू करणार!

‘370’ बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला ती पूर्ववत हवी आहे. आम्ही सत्तेत आलो तर कलम 370 पुन्हा अमलात आणणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. कलम 370 हटवल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था सुधारल्याचे भाजप सांगत आहे. मात्र येथे टार्गेट किलिंग होत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे ते पुढे म्हणाले.

Related Stories

खासगी रेल्वे 2023 पासून धावणार

datta jadhav

एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास 4 मे पासून सुरू

prashant_c

हायकमांडच्या परवानगीशिवाय लखीमपूरची घटना शक्य नाही, ओवेसींचा आरोप

Archana Banage

भारतात कोरोनामुळे अजून वाईट स्थिती येईल; गुगलचे सुंदर पिचाईंचा इशारा

Archana Banage

शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ संमिश्र

Patil_p

बोम्माईंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ

Patil_p