Tarun Bharat

काँग्रेसी ‘पेच’

Advertisements

राजस्थानामधील नेतृत्वबदलावरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असून, या पदाकरिता पक्षश्रेष्ठींकडून प्रामुख्याने अशोक गेहलोत यांच्या नावाला पसंती देण्यात येत होती. किंबहुना एक व्यक्ती, एक पद न्यायाने गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्याकरिता गेहलोत राजी असल्याचे मानले जात असतानाच राजस्थानमधील काँग्रेसच्या 102 पैकी 82 गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचे हत्यार उपसल्याने काँग्रेसमध्ये अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. राजस्थानमधील या राजकीय संकटामुळे अध्यक्षपदाचा काँग्रेसचा मार्ग अधिकच खडतर झाला असून, ही कोंडी फोडण्याचे आव्हान पक्षापुढे असेल. राजस्थानमध्ये गेहलोत व सचिन पायलट यांच्यातून विस्तवही जात नाही. स्वाभाविकच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यास पायलट यांच्याऐवजी आपल्या समर्थकाची वर्णी लागावी, अशी अपेक्षा सुरुवातीपासूनच गेहलोत बाळगून होते. तथापि, पायलट यांना शब्द दिल्याने मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे सोपविण्याचा काँग्रेसश्रेष्ठींचा प्रयत्न होता. परंतु, गेहलोत समर्थकांच्या बंडामुळे येथील नेतृत्वाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झालाय, असे म्हणता येईल. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून येईपर्यंत गेहलोत हेच मुख्यमंत्री असायला हवेत, पायलट यांनी राजस्थानमधील सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्याने त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, 19 ऑक्टोबरनंतर काँग्रेसचे नवे अध्यक्षच राजस्थानचा मुख्यमंत्री निवडतील, अशा अटी हे समर्थक पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकांपुढे ठेवत असतील, तर त्याचा अर्थ त्यांनी पक्षालाच सरळसरळ आव्हान दिले आहे, असा होतो. स्वाभाविकच हा तिढा पूर्णांशाने सोडविणे सोपे नसेल. किंबहुना, या सगळय़ा राजकीय नाटय़ामुळे गेहलोत यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग आता जवळपास बंद झाल्यात जमा आहे. गेहलोत हे काँग्रेसचे मुरब्बी नेते मानले जातात. इंदिरा गांधी, राजीव गांधी व पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले असून, मुख्यमंत्रिपदाची ही त्यांची तिसरी टर्म आहे. भाजपाचा अश्वमेध रोखण्यासह त्यांच्या आक्रमणांना पुरून उरत राज्य टिकविणारा नेता ही त्यांची अलीकडच्या काही दिवसांत निर्माण झालेली प्रतिमा. स्वाभाविकच त्यांच्यासारख्या लोकनेत्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी येणे, ही निश्चित मोठी संधी होती. परंतु, गेहलोत यांचा जीव राज्यातच अडकला असेल, तर त्याला काय करणार? यातून राष्ट्रीय नेता होण्याची संधी त्यांनी दवडली, असे नक्कीच म्हणता येते. आजही भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी हा काँगेस पक्षच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड, ईशान्येतील काही राज्यांमध्ये हे दोन पक्षच मुख्यतः आमनेसामने असतात. या राज्यांसह अन्यत्र महागाई, बेरोजगारीसह आर्थिक मुद्दय़ांवर सत्ताधाऱयांना बॅकफुटवर आणून काँग्रेसला संजीवनी देता आली असती. त्याकरिता गांधीतर नेतृत्व म्हणून पुढे येण्याकरिता गेहलोत यांनाच अधिक अनुकूल वातावरण होते. पण राज्यावरची पकड ढिली होऊ न देण्यालाच त्यांनी प्राधान्य दिल्याने आता काँग्रेसला नवा अध्यक्ष शोधावा लागेल. शशी थरूर हेही काँग्रेस अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. असे असले, तरी त्यांच्या नावास होकार देण्याच्या मनःस्थितीत गांधी कुटुंबीय नाहीत. त्यामुळे आता के. सी. वेणुगोपाळ, मुकुल वासनिक, दिग्विजयसिंह, मल्लिकार्जुन खर्गे, कमलनाथ यांची नावे पुढे येताना दिसतात. त्यामुळे नेमकी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसऱया बाजूला काँग्रेसकडून कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी या माध्यमातून मैदानात उतरले असून, तामिळनाडू, केरळात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळते. परंतु, राजस्थानी गंडांतर व अध्यक्षपदाच्या पेचामुळे यात्रा झाकोळली जाऊ शकते. काँग्रेससारख्या पक्षाला साधा अध्यक्षपदाचा प्रश्न मिटविता येत नाही, असा संदेश यातून दृढमूल होऊ शकेल. लोकसभा निवडणुकीला आता अवघा दीड ते दोन वर्षांचा अवधी आहे. मागच्या आठ वर्षांत कोणताच पक्ष भाजपापुढे आव्हान निर्माण करू शकलेला नाही. गेल्या दोन लोकसभांचा विचार केला, तर काँग्रेसची गाडी 50 ते 55 पर्यंतच्या वर सरकलेली नाही. या खेपेला किमान 100 जागांचे लक्ष्य पक्षाला ठेवता आले असते. मात्र, असे अंतर्विरोध निर्माण होत असतील, तर आहे त्या जागा राखणेही अवघड बनेल. गांधीतर नेतृत्व असावे, या मुद्दय़ावर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी आग्रही आहेत. गांधीतर नेत्याकडे अध्यक्षपद सोपविल्यास घराणेशाहीच्या आरोपातून काँग्रेसची बऱयाच अंशी मुक्तता होऊ शकते. त्यामुळे या पेचाच्या पार्श्वभूमीवर राहुल अध्यक्षपद स्वीकारू शकतात, असा निष्कर्ष लगेचच काढणे घाईचे ठरेल. दुसऱया बाजूला राहुल यांच्या यात्रेत सहभागी झालेल्या पायलट यांची पुढची भूमिका काय असेल, यालाही महत्त्व असेल. विश्वासू मानल्या जाणाऱया गेहलोत यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबीयांनाच आव्हान दिल्याने पायलट यांचे राजकारण आगामी काळात भरारी घेणार का, हे पहावे लागेल. भाजपाच्या वेशीवर जाऊन परतलेला हा नेता जपणे अखेरीस काँग्रेसचीही गरज म्हणावी लागेल. आता काही समर्थकांनी तलवारी म्यान केल्याचेही बोलले जाते. काही असो पण काँग्रेससाठी हा प्रतिष्ठेचा व कसोटीचा क्षण म्हणता येईल. हा पेच लवकर सुटला, तर ‘भारत जोडो’तून लोकांना जोडता येईल. अन्यथा, पुढचा मार्गही तुटीचा ठरण्याचीच शक्यता जास्त.

Related Stories

आता उजाडेल….

Omkar B

लेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी

Patil_p

ऐसें पाणिग्रहण जालें

Patil_p

पाणीपुरी

Patil_p

मनरेगाच्या माध्यमातून पशुसंवर्धन योजना

Patil_p

अजरामर क्रांतिवीर!

Amit Kulkarni
error: Content is protected !!