हृदयविकाराचा झटका ः राहुल गांधींनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
जालंधर / वृत्तसंस्था
पंजाबमधील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंह (वय 76) यांचे शनिवारी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने ते चालत असतानाच यात्रामार्गात कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासदार संतोख सिंह यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी धालीवाल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुसरीकडे राहुल यांनी भारत जोडो यात्रा रविवारपर्यंत थांबवली आहे. अंत्यसंस्कारानंतर यात्रा पुढे सुरू होणार आहे.
संतोख चौधरी शनिवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. फगवाडाजवळील भाटिया गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चौधरी यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. ते पंजाबमधील जालंधर एससी मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार होते. पंजाबमधील जालंधरचे रहिवासी असलेल्या चौधरी यांनी बीए, एलएलबीची पदवी मिळवली होती. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. प्रचंड मोदी लाटेतही ते दोनदा विजयी झाले यावरून त्यांच्या राजकीय उंचीचा अंदाज लावता येतो. ते दोआबातील प्रमुख दलित नेते होते आणि राजकीयदृष्टय़ा प्रभावशाली कुटुंबातून आले होते. पंजाबचे पहिले शिक्षणमंत्री मास्टर गुरबंता सिंह यांचे ते पुत्र होते. संतोख सिंह यांचे पुत्र विक्रमजीत सिंह चौधरी हे फिल्लौरचे आमदार आहेत.
राहुल गांधी यांची तत्परता
संतोख सिंह यांची प्रकृती बिघडली तेव्हा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवून त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात नेत असतानाच ऍम्ब्युलन्समध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते तातडीने संतोख सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले. सहकाऱयाच्या मृत्यूच्या वृत्ताने राहुल गांधी यांनी शोक व्यक्त करत भारत जोडो यात्रा एका दिवसासाठी तात्पुरती थांबवली आहे. तसेच राहुल गांधी यांची रविवारी जालंधरमध्ये आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषदही पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही पत्रकार परिषद 17 जानेवारीला होशियारपूरमध्ये होणार आहे.
पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांची श्रद्धांजली
संतोख सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंजाबच्या लोकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी ते स्मरणात राहतील. मी त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, भगवंत मान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही संतोख सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जालंधरचे लोकसभा खासदार संतोख चौधरी यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने आकस्मिक निधन झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाल्याचे म्हटले आहे.