गुवाहाटीः 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष एकत्र येण्याची तयारी करत आहेत. परंतु याचदरम्यान आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटने वेगळा मार्ग पत्करला आहे. एआययुडीएफने 2024 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. एआययुडीएफ आसाममधील 14 पैकी 7-8 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार आहे. काँग्रेस आता विश्वसनीय पक्ष राहिला नसल्याचे पक्षाकडून म्हटले गेले आहे. पक्षाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत किमान 7 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. आम्ही स्बळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहोत. मागील विधानसभा निवडणूक काँग्रेस तसेच काही अन्य पक्षांसोबत मिळून लढविली होती असे एआययुडीएफचे महासचिव आणि आमदार रफीकुल इस्लाम यांनी सांगितले आहे.
2006 पासून आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही करीमगंज, बारपेटा आणि धुबरी या मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी धुबरीमधून विजय प्राप्त केला होता. आगामी निवडणुकीत आम्ही किमान 3 मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत असे रफीकुल इस्लाम यांनी म्हटले आहे.