विजय पाठक / जळगाव :
Congress regional convention to Faizpur जळगाव जिल्ह्यात निष्क्रिय झालेल्या पक्षाला उभारणी देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अधिवेशन फेजपूरला घेण्याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विचार असून, त्यांनी आपणास याबाबत पूर्व तयारीच्या सूचना दिल्या आहेत. पक्षात निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. काम न करणाऱ्यांना आपली पदे सोडावी लागणार असल्याची माहिती काँग्रेसचे जळगाव जिल्हयाचे प्रभारी विनायकराव देशमुख यांनी आज ‘तरूणभारत’शी बोलतांना दिली.
1936 मध्ये जिल्ह्यातील फैजपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. पक्षाचे ते पहिले ग्रामीण अधिवेशन होते. म. गांधी पासून पंडित नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद ते वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत राष्ट्रीय नेत्यांनी या फैजपूरला हजेरी लावली होती. स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्हा हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आणिबाणीनंतर देखील जनता पक्षाच्या राजवटीत जळगावच्या लोकसभेच्या जागा या काँग्रेसनेच जिंकल्या होत्या. प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरींसारखे नेते या जिल्हयाने राज्याला दिले होते. नंतर मात्र जिल्हयात पक्षाला ओहोटी लागली. आज जिल्ह्यात काँग्रेस मृतप्राय झालेली आहे.
पक्षात कार्यकर्ते कमी आणि गटबाजीत अडकलेले नेते असे चित्र असून, याचा फटका पक्षाला बसला आहे. याबाबत विचारता विनायकराव देशमुख यांनी चिंता व्यक्त करत ही बाब प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये परत नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यंदा फैजपूरला प्रदेश अधिवेशन घेणार आहेत. याबाबत त्यांनी फैजपूर येथे त्यांच्या दौऱ्यात तसे सांगितले होते. आता आपल्याला प्रदेश अधिवेशन घेण्याबाबत पूर्वतयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या अधिवेशनातून जिल्हयात परत काँग्रेसचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, तसेच कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी राहील, अशी पटोले यांची अधिवेशन घेण्यामागे भूमिका आहे.
प्रभारी म्हणून नियुक्तीनंतर जिह्यात पक्ष संघटना बांधणीवर आपले लक्ष केंद्रीत राहणार असून, पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभे राहणार असून, पक्षात असलेली गटबाजी बेशिस्त आपण अजिबात खपवून घेणार नाही. पक्ष सदस्य नोंदणी न करणारे निष्क्रिय केवळ जाहिरातबाज पदाधिकारी, संघटन मजबूत न करणाऱ्या पदाधिकाऱयांना त्यांच्या खुर्चा खाली करण्यास सांगणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगितले.