विविध समुदायांशी संबंधित 7 कार्याध्यक्ष नियुक्त
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस स्वतःची समीकरणे दुरुस्त करू पाहत आहे. राज्यात 27 वर्षांपासून काँग्रेस सत्तेचा वनवास झेलत आहे. अशा स्थितीत गुजरातचे राजकीय युद्ध जिंकण्यासाठी काँग्रेसने 7 कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले आहेत. दलित, ओबीसी, पटेल, क्षत्रिय, मुस्लीम समुदायाच्या नेत्यांना यात स्थान देण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकारी अध्यक्षाद्वारे गुजरातमध्ये स्वतःच्या जुन्या सोशल इंजिनियरिंगच्या फॉर्म्युल्याद्वारे 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकू पाहत आहे.
आदिवासी समुदायाशी संबंधित आमदार सुखराम राठवा यांना गुजरात विधानसभेत काँग्रेसकडून विरोधीपक्षनेतेपद देण्यातआले आहे. तर ओबीसी समुदायाच्या जगदीश ठाकोर यांनी प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षनेतृत्वाने गुजरातमध्ये 7 कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले आहेत. जिग्नेश मेवाणी, ललित कागाथरा, रित्विक मकवाना, अंबरीश डेर, हिम्मत सिंह पटेल, कादिर पीरजादा आणि इंद्रविजय सिंह गोहिल यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दलित नेते मेवाणींना जबाबदारी
गुजरातमध्ये दलित नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेले जिग्नेश मेवाणी आता काँग्रेससोबत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने त्यांना गुजरातसाठी कार्यकारी अध्यक्ष केले आहे. जिग्नेश यांना काँग्रेसमध्ये फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या माध्यमातून दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. निवडणुकीपूर्वी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करत दलित समुदायाला मोठा राजकीय संदेश देण्याची खेळी काँग्रेसने केली आहे. राज्यातील दलित राजकारणात मेवाणी हे महत्त्वाचे नेते ठरले आहेत.
हार्दिकला पर्याय कागाथरा
पटेल आरक्षण आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिकच्या पक्षत्यागाची भरपाई करण्यासाठी काँग्रेसने त्यांचे जुने सहकारी ललित कागाथरा यांना गुजरात काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमले आहे. पाटीदार आंदोलनावेळी सौराष्ट्रात कागाथरा सक्रीय होते. ललित हे पाटीदार असून सौराष्ट्रातील पाटीदार राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव आहे. काँगेसने 2017 मध्ये त्यांना टंकरा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात विजयी होत ते आमदार झाले होते.
ओबीसींवर विशेष नजर
गुजरातमध्ये काँग्रेसचा सर्वात मोठा भर ओबीसी मतपेढीवर आहे. याचमुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जगदीश ठाकोर हे धुरा सांभाळत आहेत. आता त्यांच्यासोबत तीन ओबीसी नेत्यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अंबरीश डेर आणि हिम्मत सिंह पटेल आणि रित्विक मकवाना यांना हे पद मिळाले आहे. मकवाना हे ओबीसी समुदायाचे मोठे चेहरे आणि आमदार आहेत. अंबरीश डेर हे देखील आमदार असून ओबीसींमधील अहिर समुदायाचे ते सदस्य आहेत. गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रात अमरोलीनजीकच्या भागात अंबरीश यांचा मोठा प्रभाव आहे. तर हिंमत सिंह पटेल यांची पक्षसंघटनेवर चांगली पकड आहे.
मुस्लीम मतपेढी
गुजरातमध्ये काँग्रेस स्वतःची मुस्लीम मतपेढी कुठल्याही स्थितीत राखू पाहत आहे. या मतपेढीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष करत आहे. अशा स्थितीत काँग्रेस मुस्लीम मतपेढीसंबंधी कुठलीही जोखीम पत्करू इच्छित नाही. याचमुळे कादिर पीरजादा यांना गुजरात कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करून राजकीय संदेश देण्यात आला आहे. अहमद पटेल हयात असेपर्यंत काँग्रेसला मुस्लीम मतपेढीबद्दल चिंता नव्हती. परंतु आता त्यांच्या निधनानंतर काँग्रेसला एका मुस्लीम चेहऱयाचा शोध होता.
गोहिल अन् क्षत्रिय समुदाय काँग्रेसने क्षत्रिय समुदायाशी संबंधित इंद्रजीत गोहिल यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्षपद दिले आहे. गुजरातमध्ये क्षत्रिय समुदाय हा काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे. शक्तिसिंह गोहिल हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यावर पक्षाने इंद्रजीत गोहिल यांचा चेहरा पुढे करण्याचे सत्र आरंभिले आहे. इंद्रजीत हे युवा नेते असून त्यांना संघटनेची जबाबदारी देत क्षत्रिय समुदायाला राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.