Tarun Bharat

काँग्रेसला लागले भिकेचे डोहाळे

Advertisements

एखादी गोष्ट चांगली चालली असेल तर त्याचा विचका कसा करायचा हे कोणाकडून शिकायचे असेल तर ते सोनिया गांधी आणि परिवाराकडून असे कोणी म्हटले तर वावगे ठरू नये. आपले नि÷ावंत अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचा त्यांनी घाट घातला होता. पण त्याच्यावर या घराण्यानेच एक प्रकारे पाणी फिरवले आहे. एव्हढेच नव्हे तर गेहलोत यांना आता राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून काढावयाचा प्रकार सुरु केला आहे. राजस्थानमध्ये वर्षभरात निवडणूका आहेत. राज्य भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरु असल्याने गेहलोत यांच्या कलाने घेतले तरच परत काँग्रेस सत्तेत येण्याची संधी आहे. 

पण उफराटेच होताना दिसत आहे. भिकेचे डोहाळे लागल्याप्रमाणे काँग्रेस का करायला लागली आहे? असे प्रश्न उद्भवत आहेत. गेहलोत विरोधक सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावयाचा राहुल गांधींनी चंगच बांधला आहे. या ‘बालहट्टा’ पुढे आईचा नाईलाज दिसत आहे. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून नादान अशा नवज्योतसिंग सिद्धू यांचे प्रस्थ गांधी परिवारानेच वाढवले होते. पंजाबमधील सत्ता गेली पण त्यातून शहाणपण कितपत आले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली नसती तरच नवल ठरले असते.

गेहलोत यांनीच अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून स्वतःचे अंग काढून घेऊन पक्षापुढे एक वेगळेच संकट उभे केले आहे. गेहलोत यांच्यासारख्या मागासवर्गीय समाजातील नेत्याला पक्षाध्यक्षपद देऊन राजकारणात एक नवीन गणित मांडण्याचा धाडसी प्रयोग काँग्रेसने सुरु केला असून बहुसंख्यांक असलेल्या ओबीसी समाजाला आपल्याकडे आकृष्ट करून भाजपच्या राजकारणाला छेद देण्याची खेळी त्याने सुरु केली आहे असे मानले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील आहेत.

2014 ला सत्तेत आल्यापासून अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसला कमजोर करायचाच हा प्रयत्न आहे का? वा घराचे वासे फिरले असले तरी आपणच ‘हाय कमांड’ आहोत आणि आपण म्हणेल ती पूर्व? असाच काँग्रेसच्या प्रथम परिवाराचा समज आहे काय? असे एकानेक प्रश्न आहेत.

आपल्या जीवावरच उठलेल्या गांधी परिवाराला गेहलोत यांनी जो जयपुरी हिसका दाखवला आहे त्याचे पडसाद फार काळ रेंगाळत राहणार आहेत. आता शेवटच्या क्षणी 80 वर्षाच्या मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवण्यात आले आहे. गांधी परिवारातील कोणीही काँग्रेस अध्यक्ष होणार नाही असे एकीकडे जाहीर करायचे आणि दुसरीकडे येनकेन प्रकारेण हे पद आपल्याकडे अथवा आपल्या होयबाकडे राहील अशा चाली खेळत रहावयाच्या याला काय म्हणावे?. मांजर डोळे बंद करून दूध पीते पण त्याचा अर्थ जगाचे डोळे बंद असतात असा नव्हे? 81 वर्षाच्या अँटनीना देखील याबाबत चाचपण्यात आले होते. तुम्ही हे पद स्वीकारणार काय असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला तेव्हा ‘मी मूर्ख नाही’ असे मासलेवाईक उत्तर त्यांनी दिले. गेहलोत यांनी खर्गे यांच्याबरोबर अर्ज सादर करताना खास उपस्थित राहून एक नवा डाव खेळला आहे. त्यांना हटवणे हे अवघड जागेचे दुखणे बनले आहे.

आसाममधील एका आमदाराने प्रियंका गांधी या आता श्रीमती वद्रा झाल्या असल्याने त्यांना पक्षाध्यक्ष बनवण्यात काय हरकत आहे असा फसवा युक्तिवाद  केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकात काँग्रेसने जी जबर आपटी खाल्ली तेव्हापासून पक्षकार्यकर्त्यांच्या मनातील प्रियंकांच्या नेतृत्वाबाबतचे आकर्षण एकदम घसरले आहे. आता त्यांना गुजरातमध्ये पाठवणार अशी वदंता आहे. तिथे त्यांनी मर्दुमकी दाखवली तरच त्यांचा भाव वधारेल.

शशी थरूर यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरून त्यात रंग भरला आहे. थरूर यांनी विविध प्रकारे काँग्रेसमध्ये जान आणण्यासाठी या उमेदवारीचा उपयोग चालवला आहे. काँग्रेसजनांची आशा ते पल्लवित करत आहेत. असे असले तरी त्यांच्या उमेदवारीमागे काहीतरी काळेबेरे आहे अशी कुजबुज देखील सुरु झाली आहे. त्यात कितपत तथ्य ते येणारा काळच दाखवेल. थरूर यांची पक्षकार्यकर्त्यात वाढत असलेली लोकप्रियता गांधी परिवाराला रुचत आहे असे मानणे फारसे बरोबर नाही. 

गेहलोत यांनी दिलेला हिसका आणि थरूर यांनी पुढे केलेली आपली उमेदवारी यातून काँग्रेसमधील हाय कमांडचा अगोदरच कमी होत चाललेला दबदबा अजून कमी होताना दिसत आहे. गेहलोत यांना धडा शिकवण्याचा प्रकार करून गांधी परिवाराने आपल्याच पायावर कुऱहाड पाडून घेतली आहे. नेतृत्व जर संवेदनशील नसेल तर त्याच्याभोवती लोक कसे जोडले जाणार. शिवरायांसारखा थोर नेता असेल तरच तानाजी म्हणतो ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे’. नाहीतर इतरांना फक्त भोजनभाऊ भेटतात.

‘भारत जोडो यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्याने राहुल गांधी हेच पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असा संदेश सर्वदूर गेला असतानादेखील  गांधी घराण्याची असुरक्षिततेची भावना अजिबात गेलेली नाही असाच या साऱया प्रकाराचा अर्थ आहे. द्वेषाने प्रेरित असलेले भाजपचे केंद्र सरकार हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपले कांडात काढेल अशी भीती या परिवारात आहे. ती वावगी नव्हे. अशावेळी काँग्रेस अध्यक्षपदाची कवचकुंडले त्याने आतापर्यंत बाळगली होती, स्वतःकडे ठेवली होती. आता खर्गे आपल्याला साथ देतील असा या परिवाराला विश्वास आहे. तीन वेळा ज्या खर्गेना कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद काँग्रेसने नाकारले त्यांना आता दादा बाबा करून तुम्हीच अध्यक्ष बना अशी विनवणी करावी लागावी हा काँग्रेसच्या प्रथम परिवारावर काळाने उगवलेला सूड आहे.  गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून घराणेशाहीबाबत असलेली भाजपची जहाल टीका कमी करण्यासाठी हा नवीन प्रपंच त्याला मांडावा लागत आहे.

ही ‘नवी विटी, नवे राज्य’ गांधी घराण्याला कितपत धार्जिणे राहणार ते येत्या काळात दिसणार आहे. अलीकडील काळात गांधी घरण्याबाहेरील जे नेते पक्षाध्यक्ष बनले त्यांनी श्रे÷ाrंनाच अंगठा दाखवला हा ताजा इतिहास आहे. पंतप्रधान नरसिंह राव यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने गांधी घराण्याला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले तसेच सीताराम केसरी यांनीदेखील. ज्या नरसिंह राव यांनी केसरीचाचाना हे सर्वोच्च पद दिले त्यांचे तिकीटच केसरींनी कापले होते.

खर्गे हे जुनेजाणते नेते असल्याने ते कोणाचे रबर स्टॅम्प होतील असे दिसत नाही. त्यांच्या रूपाने काँग्रेसमध्ये एक नवीन सत्ताकेंद्र स्थापन होणार आहे. काँग्रेस मुक्त भारत मोहीम जोरदार चालू असताना पक्षापुढे निरंतर संघर्षाला पर्याय नाही. राहुल यांची यात्रा जर उत्तरेत देखील खूप प्रतिसाद मिळवू लागली तर सत्ताधारी काँग्रेसपुढे नवी आव्हाने उभी करू शकतात हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. अध्यक्ष म्हणून खर्गे यांची पहिली कसोटी ही मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य गुजरातमध्ये आहे. तिथे पुढील तीन महिन्यात निवडणूका
आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष अगोदरच जोमाने कामाला लागला आहे. सहा महिने झाले तरी उत्तर प्रदेशात काँग्रेसला अध्यक्षच नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे बारा वाजल्याने प्रियांका गांधी यांचे खासमखास मानले जाणाऱया अजयकुमार लल्लू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा श्रे÷ाrंकडे केव्हाच पाठवला आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस मरणासन्न अवस्थेत असताना खर्गे तिथे कसा खेळ करणार त्यावर त्यांचे नेतृत्व अवलंबून राहील.

सुनील गाताडे

Related Stories

बिहारचे रण

Patil_p

पळोनि गेली पिशाचसेना

Omkar B

चार भिंतींच्या बाहेरची शाळा

Patil_p

राजकीय मोहिमा

Patil_p

कालिदासाचे मेघदूत… एक खंडकाव्य (38)

Patil_p

।।अथ श्रीरामकथा ।।

Patil_p
error: Content is protected !!