गोव्यातील विविध विषयांवर करणार चर्चा
प्रतिनिधी /पणजी
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर येथून सायंकाळी नवी दिल्लीला रवाना झाले. आपल्या दिल्ली दौऱयात ते आज गोव्यातील विविध विषयांवर चर्चा करतील. तथापि, काँग्रेस विधीमंडळ नेता निवडीचे काम हे मागाहून गोव्यातच करण्यात येणार आहे. अमित पाटकर हे आज नवी दिल्ली येथे होणाऱया प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
नवी दिल्लीतून दै. ‘तरुण भारत’शी बोलताना अमित पाटकर यांनी सांगितले की, आज सर्व प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची बैठक येथे होत असून त्या बैठकीस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ हे मार्गदर्शन करतील. या बैठकीनंतर आपण स्वतंत्रपणे त्यांची भेट घेणार असून गोव्यातील विद्यमान परिस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करेन. यानंतर पुन्हा एकदा दि. 4 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत देखील आपण सहभागी होणार आहे. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही विदेश दौऱयावर आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीस दोघेही अनुपस्थित राहातील.
काँग्रेस विधीमंडळ नेता मागाहून
दरम्यान काँग्रेस विधीमंडळ नेत्याची निवड ही मागाहून करण्यात येणार आहे. या संदर्भात आपण पक्षाचे नेते दिनेश गुंडूराव यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतर पक्षाचे निरीक्षक गोव्यात येतील व काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक गोव्यात होईल. या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे. यानंतर सभापतींना पत्र पाठवून सदर विधीमंडळ नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करा, अशी विनंती केली जाणार आहे.