आमदार सतेज पाटील यांचे आश्वासन : बंदमुळे 200 कोटीची उलाढाल ठप्प : छत्रपती शिवाजी चौकात व्यापाऱयांची निदर्शने : धान्य बाजारात कडकडीत बंद
प्रतिनिधी/कोल्हापूर
काँग्रेस पक्षातर्फे अन्नधान्य, खाद्यान्न व गूळावर लावण्यात आलेला, 5 टक्के वस्तू व सेवा (जीएसटी) कर रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी व्यापारी संघटनेना दिले.
वस्तू व सेवा (जीएसटी) कराविरोधात शनिवारी देशव्यापी संप पुकारला आहे. याला पाठींबा म्हणून, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशन, दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनमार्फत कोल्हापूरात हा बंद पुकारण्यात आला. शनिवारी छत्रपती शिवाजी चौकामध्ये निदर्शने करून, शहरातील आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या बंदमुळे शहरातील 200 कोटी रूपयाची आर्थिक उलाढाल ठप्प झाली असल्याचे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
47 व्या जीएसटी कौन्सीलने अन्न धान्य व खाद्य पदार्थ तसेच गूळावर 5 टक्के जीएसटी 18 जुलैपासून लागू केला आहे. जीएसटीमुळे विपरीत परिणाम पारंपारिक व्यापारावर पडून, यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळण्याची शक्यता आहे. अगोदरच खाद्यान्न वस्तूंवर एक टक्का सेस आकारला जात आहे.
हे ही वाचा : मंडणगड शहर विकास आघाडी शिंदे गटात सामील
त्यानंतर व्यापाऱयांनी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांना निवेदन सादर करुन या कराची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील , धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अभय अथणे, गूळ व्यापारी अतुल शहा, चेंबरचे संचालक अजित कोठारी, संपत पाटील, संभाजीराव पोवार, राहुल नष्टे, विवेक शेटे, श्रीनिवास मिठारी, सुरेश लिंबेकर, किरकोळ किराणा असोसिएशनचे संदीप वीर, अरुण सावंत, अनिल धडाम आदी उपस्थित होते.