प्रतिनिधी /पणजी
सायंकाळी उशिरा काँग्रेसचे नेते मुकूल वासनिक यांनी अत्यंत महत्त्वाची काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक बोलावली होती. या बैठकीत केवळ सहा आमदार उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो तसेच आमदार केदार नाईक व राजेश फळदेसाई हे देखील उपस्थित राहिले. दिगंबर कामत वगळता काँग्रसचे सर्व आमदार यावेळी उपस्थित होते.
मुकूल वासनिक यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली. मायकल लोबो यांनी देखील सुमारे 15 ते 20 मिनीटे त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मायकल लोबो यांनी आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार आहोत आणि पक्षाशी गद्दारी केली नाही, असे स्पष्टीकरण दिले. आपण या सदंर्भात मुकूल वासनिक यांच्याशी स्वतंत्रपणे बोललो. आपल्याला काँग्रेस विधिमंडळ नेता हे पद नको असे आपण त्यांना कळविले आणि कुणालाही नियुक्त करा, आपली कोणतीच अट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत बैठक चालू होती. त्यात विधिमंडळ नेता निवडला जाणार होता.