पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून पर्याय
बेळगाव : पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाच्यावतीने ऑनलाईन प्रश्नपत्रिकेचा पर्याय निवडण्यात आला आहे. सध्या सुरू असणाऱ्या दहावीच्या पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन देण्यात आल्या असून, हा प्रयोग यशस्वी झाल्याने यापुढे होणाऱ्या एसएसएलसी, पीयूसी, पाचवी व आठवी इयत्तांच्या केंद्र परीक्षाही ऑनलाईन प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून घेण्याचा विचार केला जात आहे. एसएसएलसी, पीयूसी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तज्ञ शिक्षकांकडून तयार केल्या जातात. एका विषयाचे तीन ते चार सेट तयार असतात. त्यापैकी कोणताही एक सेट छपाईसाठी पाठविला जातो. छपाई परराज्यात केली जाते. छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका एक दिवस आधी ट्रेझरी विभागाला पाठविल्या जातात. परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका गेल्यानंतरच त्या खुल्या केल्या जातात. परंतु यामध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याचा मोठा धोका असतो.
सोमवार दि. 27 फेब्रुवारीपासून दहावीच्या पूर्वपरीक्षेला सुरुवात झाली. राज्यात 8 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची पूर्वपरीक्षा दिली. राज्य सरकारकडून गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग ईनवर प्रश्नपत्रिका पाठवून त्यांच्या प्रति काढण्यात आल्या. तेथून त्या शाळांपर्यंत पोहोचविल्याने पेपरफुटीचा प्रश्नच उरला नाही. 2016 साली दोन पेपर फुटल्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी लागली होती. त्यावेळीही ऑनलाईन पर्याय निवडण्यात आला. ऑनलाईन प्रश्नपत्रिका देण्याबाबत अनेक तांत्रिक त्रुटी असल्या तरी त्या दूर केल्यास पेपरफुटीची समस्या कायमची दूर होणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे ऑनलाईन प्रश्नपत्रिका काढणे कठीण असले तरी यावर पर्याय शोधल्यास ही परीक्षा पद्धती महत्त्वाची ठरणार आहे.