Tarun Bharat

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे दिल्लीतील नेतृत्वाचे कारस्थान

पुणे / प्रतिनिधी :

गुजरातच्या दिल्लीत बसलेल्या नेतृत्वाचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा मनसुबा आहे. सोलापूर, सांगलीतील काही गावे कर्नाटकला जोडण्याचे कारस्थान महाराष्ट्रद्वेष्टय़ा भाजपाने रचले असून, काँग्रेस महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपावर निशाणा साधला.

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रालाही मूठभर गुजरातींनी विरोध केला होता. तो राग अजूनही त्यांच्या मनात असून, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा गुजरातच्या दिल्लीत बसलेल्या नेतृत्वाचा मनसुबा आहे. तर कर्नाटकच्या सरकारलाही भाजपाने टार्गेट दिले आहे. आधी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचा सपाटा लावण्यात आला होता. हे सत्र थांबल्यानंतर न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमावादाच्या पलीकडे जाऊन सोलापूर व सांगलीतील जतचा भाग कर्नाटकला जोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्राचे तुकडे काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. महाराराष्ट्राची अस्मिता आम्ही सांभाळून ठेऊ. येथील जनतेला सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्र सुरक्षित ठेऊ, ही आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, यापूर्वीदेखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशाच प्रकारची विधाने केली जात आहेत. या दोन्ही घटनेनंतर काँग्रेस पक्षाकडून जाहीर भूमिका मांडत निषेध नोंदविण्यात आला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, यावर भाजप नेतृत्वाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची भूमिका मांडण्यात आलेली नाही. भाजप नेत्यांची आजवरची विधाने लक्षात घेता त्यांचा पेशवाई आणण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यांना पेशवाईसोबत का शिवशाहीसोबत राहायचे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. काँग्रेस पक्ष कायम शिवशाहीसोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

भाजपकडून सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे काम होत आहे. त्यामुळे राज्यातील जनता भाजपला कधीच माफ करणार नाही. या अभद्र आणि अवैचारिक ईडी सरकारचा लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करतानाच छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत थोडा स्वाभिमान शिल्लक असेल, तर आज मंत्री, खासदार आणि आमदार झालेले खुर्ची सोडू शकतात का, असा सवालही पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.

Related Stories

कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपला फायदा

datta jadhav

‘बुल्ली बाई’ प्रकरणी तिघांना अटक; तपासाची चक्रे गतीमान

Abhijeet Khandekar

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी

datta jadhav

Money Laundering Case: दिल्ली न्यायालयाकडून शिवकुमार यांना समन्स

Archana Banage

दुर्गम बामणोली खोऱ्यातील सावरी गावात आढळले पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

ओडिशामध्ये आणखी 16 दिवस वाढविले लॉकडाऊन!

Tousif Mujawar